पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

 खजूरखजुरीचा विवाह–इकडील प्रदेशांत खजुरीशिवाय झाड दिसावयाचे नाही असे मागे म्हटलेच आहे. फांद्या फाटक्या, खवल्यांनी भरलेलें खोड असे या वृक्षाचे थोडक्यांत स्वरूप वर्णन करता येईल. पण चिखलात रुतलेले असे हे रूक्ष प्रदेशांतील विद्रूप झाड प्रणयपंकांत किती खोल गेलेले असते याची बाह्यात्कारी कोणांस कल्पनाही यावयाची नाही. आपल्या रूढीनुसार दरवर्षी तुळशीचा विवाह श्रीकृष्णाशी लावतात. संस्कृत कवींच्या संकेताप्रमाणे अशोक आणि बकुल या वृक्षांस पुष्पप्रसूतीपूर्वी डोहाळे लागतात. या गोष्टी आपल्या परिचयाच्या असल्या तरी खजुरीच्या झाडांच्या इतका रंगेलपणा दुसऱ्या कोणत्याही वनस्पतींच्या आंगीं नसावा असे वाटते ! पोपयाच्या नर व मादी अशा दोन जाती असतात. तसाच प्रकार खजुरींतही आहे. प्रतिवर्षी खजूरवृक्षाचा विवाह करावा लागतो. आणि एका खजुराला बारा बारा खजुरी स्त्रियांची आवश्यकता असते. खजुरीच्या मळ्यांत गेल्यास तेरा तेरा झाडांचा एक एक गट केलेला दिसेल, त्यांपैकी एक डझन स्त्रिया व एक पुरुष. हा विवाहकालही ठरलेला दिसतो.खजुरीला फळे येण्यापूर्वी खजुराची फुले घेऊन ती खजुरीवर शिंपावी लागतात. दोन्ही प्रकारच्या झाडांना मोहोर आला म्हणजे ती उपवर-नव्हे विवाहास योग्य-झाली असे समजतात आणि मग वर सांगितल्याप्रमाणे खजूरांवरील फुलें खजुरींवर शिंपणे हा समारंभ म्हणजेच 'खजूरखजरी' विवाह होय ! हा मंगलदायक प्रसंग घडवून आणला नाही तर खजुरीला फळेच येत नाहीत आणि आलीच तर अगदी खुरटीं व कच्चीं रहातात असे सांगतात.

 हिंदुस्थानांत जाणारा सर्व खजूर बहुधा कच्चाच काढतात. त्यामुळे चांगला खजूर कसा असतो याची यथार्थ कल्पना हिंदी लोकांना

५४