पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/56

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

जावयाची असा निर्बध असल्याने खास हिंदी राष्ट्रासाठी यांत्रिक उजव्या हातास बसावा अशी सोय अमेरिकन मोटारवाले करीत असतात. इंग्रज मोटार कारखानदार केवळ डाव्या हाताने मोटार हाकणाऱ्यांच्या सोयीच्याच गाड्या बनवितात आणि अगदी इंग्लंडच्या कृपाछत्राखाली नांदणाऱ्या इराकने हा नवीन नियम स्वीकारून अप्रत्यक्ष रीत्या इंग्रज गाड्यांवर बहिष्कारच पुकारला आहे, असें स्वार्थी व्यापारी म्हणूं लागले आहेत. तें कांहीही असो, आता मध्यआशियांत एकच नियम सर्रास चालू आहे हें जनतेच्या दृष्टीने सोईचें आहे यांत शंका नाही.

  रूक्ष प्रदेशांत प्रेक्षणीय स्थळांचा अभाव–इराकमध्ये काय पहाण्यासारखे आहे ? असा प्रश्न केल्यास पुराणवस्तुसंशोधनखात्याने उकरून काढलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांशिवाय दुसरें काहीं नाहीं असेंच उत्तर मिळेल. पण कोठे नयनमनोहर सृष्टिशोभा किंवा चित्ताकर्षक देखावे आढळावयाचे नाहीत. दृष्टीस साजरें होण्यास डोंगर अवश्य पाहिजेत आणि त्यांचीच येथे फार उणीव आहे. वृक्षराजीविषयी बोलावयाचें म्हणजे खजुरीशिवाय दुसरें झाड दिसेल तर शपथ ! नदीचे पात्र हिंदूंना पवित्र वाटतें आणि नुसतें नांव घेतलें तरी पुरे, अनेक धार्मिक संस्कारांचा आणि पौराणिक कथांचा संदर्भ ज्ञानचक्षूंपुढे उभा रहातो. तसा कांहीच प्रकार हिंदुस्थानबाहेरील नद्यांचा नाही. तेव्हा त्यांच्याकडे तासच्या तास पहात राहिले तरी मनावर काय परिणाम घडणार ? तैग्रीस व युफ्रातीस यांचा संगम झाल्यावर शट-अल-अरब या नवीन नांवाने त्या जोडनद्या इराणी आखातांत पडतात. तीच शट-अल-अरब बसऱ्यास आहे. नदीपासून पुष्कळ आडवे कालवे सर्व शहरभर आंत काढले आहेत आणि ठिकठिकाणी ते ओलांडण्यासाठी पूल बांधलेले आढळतात व त्यांत लहानशा होड्या

५०