पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/38

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

त्या स्त्रीने आपल्या घरी लिहिले आहे असे कळते; तेव्हा मातापित्यांनी व इष्टमित्रांनी या प्रकाराकडे अवश्य लक्ष पुरवावे अशी विनंती येथे करावीशी वाटते. कारण ती मुले मराठी बोलणारी आहेत. तेव्हा हा मजकूर त्या मुलांच्या आप्तेष्टांच्या नजरेस पडेलच,
 अफगाणिस्तानांतून सर्व वकिलातीतली बायकामुलें पेशावरला आणीत असतां तुर्कस्तानांतील लष्करी तज्ज्ञांचे एक मंडळ इस्तंबूलहून येऊन मुंबईमार्गे काबूलला जाते याचा अर्थ काय ? असे कोडे बरेच जणांना पडलें. कारण काबूलहून आलेल्या स्त्रियांत तुर्की, इराणीही स्त्रिया होत्या. परंतु खरी गोष्ट अशी आहे की, याच वेळी त्या तुर्की लष्करी मिशनची आवश्यकता काबुलाधिपतीस विशेष भासली असल्यास आश्चर्य नव्हे. स्वधर्मी म्हणून म्हणा किंवा दुसरे कांहीही कारण असो, अफगाणिस्तानांत तुर्कांचे प्राबल्य सध्या जास्त आहे. अमानुल्लाचे सगळे सल्लागार बहुधा तुर्कस्तानहून आले आहेत. कांही महिन्यांपूर्वी अफगाणी तरुण मुले व मुली तुर्कस्तानला शिक्षणासाठी गेल्याचे सर्वांस ठाऊक आहेच. या लष्करी तज्ज्ञांचा मूळ हेतु अफगाण सेनेला योग्य शिस्त लावून तिची घटना कशी करावी यासंबंधीची योजना आखून देणे हा असल्याने प्रचलित बंडाळीचे वेळीही या महत्त्वाच्या पाहुण्यांना अफगाणिस्तानांत न्यावे लागले. तेथे काय वाटाघाट होते हें अर्थातच गुलदस्तांत राहील.

-केसरी, ता. २२ जानेवारी, १९२९.




३२