पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

तितका तो मोठा समजावा, असें नीत्शेचें म्हणणें आहे आणि हीच कसोटी लावून पाहिली तर, हे अफगाण सरहद्दीवरील रानटी, लोक जगांतील इतर लोकांपेक्षा पुष्कळच वरचा नंबर पटकावतील!
  बंदूक ही त्यांची शब्दश: अर्धांगीच. रात्र असो, दिवस असो, निद्रा घेतांना, जेवतांना, बंदुक ही जवळ खांद्यावर असावयाचीच! कंबरेच्या पट्यांत किंवा छातीवर गोळ्या अडकवलेल्या दिसतात. नेमबाजींत यांचा हात धरणारी जात दुसरी कोणती असेल असे वाटत नाही. यांची रक्ततृष्णाही वाघासारखी. सूड घेण्याची वृत्ति सर्पापासूनच हे शिकले असावेत किंवा सर्वांनाच धडा या नरपशूंनी घालून दिला असावा! पिढीजात वैरभावामुळे आपसांत खून करण्याचे प्रमाण यांच्यामध्यें बेसुमार वाढलेलें दिसतें. पितरांना परलोकीं उत्तम गति प्राप्त व्हावी म्हणून श्राद्धादि कर्मे आपल्याकडे करितात. अफगाणी क्रूरांचे म्हणणें असें की, वडिलांच्या मृत्यूला जो इसम कारणीभूत झाला असेल त्याला ठार केल्याविना मुलगा पितृऋणांतून मुक्त होऊ शकत नाही ! अशी ही खुनांची परंपरा सारखीच चालू असते. आणि पितरांना स्वर्लोक मिळवून देणारा पुत्र नसला तर हें काम बायका देखील करतात ! लढाई करणे म्हणजे या लोकांचा नित्याचा व्यवसाय असावा असें दिसतें. आपसांतील भांडणे कधी मिटलेलीं नसतातच; आणि ही भांडाभांडी कोर्टांत किंवा तोंडांनी चालावयाची नाही. त्यांची न्यायदेवता एकच आणि ती म्हणजे बंदूक! अशा या रानटी लोकांवर राज्य करणार कोण? त्यांना कह्यांत ठेवणे जवळ जवळ अशक्य आहे. त्यांना शिक्षणाने आपलेसें करून घेणें म्हणजे भर्तृहरीने म्हटल्याप्रमाणें--

"जो मूर्खास सुभाषिते वश करूं ऐसें झणीं बोलतो."
२०