पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/23

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वशीकरणाचे इंग्रजी उपाय

गोडीगुलाबीने वागून, त्यांना कांही सवलती देऊन, त्यांच्या कांही अटी मान्य करून, इंग्रजी अधिक-यांनी रेल्वेचा फाटा नेण्यास त्यांची संमति युक्तीने मिळविली. इतकेंच नव्हे तर ठिकठिकाणीं टेहळणीचीं नाकीं व मधूनमधून फौजफाटा ठेवण्यासाठी तात्पुरते किल्ले यांची जागाही रानटी लोकांपासून भाड्याने मिळविली. लंडीकोटलचा भुईकोट किल्ला, तेथील लष्करी छावणी, इत्यादिकांसाठीही जमीन भाडोत्री घेतली आहे. हे भाडें अर्थातच जबरें असणार. तसेच, रेल्वे बांधतांना कंत्राटें द्यावयाची होती ती सर्व तेथील रानटी लोकांसच द्यावी लागलीं असें म्हणतात. मजुरी करण्यासाठी दुसऱ्या कामगारांना येऊं दिलें जाणार नाही, आमच्याकडूनच हें काम झालें पाहिजे, अशी अट या रानटी लोकांनी घातली होती असे समजतें. त्यामुळे रेल्वेचे काम साहजिकपणेंच भलत्या महागाईने झालें. रेल्वेवर इतर कामे करण्यासाठी नोकर ठेवावयाचे तेही तद्देशीयच ठेवण्याविषयीची मागणी या स्वतंत्र लोकांनी केली होती आणि प्रत्यक्ष वस्तुस्थितीही तशीच आहे खरी. वरच्या अधिकाऱ्यांशिवाय बाकी सर्व नोकर हे रानटी पठाणच आहेत. या सर्व अडचणींमुळे रेल्वेलाइनच्या आसपासची थोडी जागा सोडून इतरत्र जाण्यायेण्याची मनाई आहे. कारण त्या ठिकाणी ब्रिटिश सत्ता नाही.

  "स्वस्थ बसायला काय घेशील?" असे खोडकर मुलाला विचारण्याचा प्रघात आपल्याकडे आहे. पण ब्रिटिश सरकार खरोखरीच गप्प बसणाऱ्या आफ्रिदी, वजिरी, महशुदी इत्यादि प्रजाजनांस मासिक वेतन देतें ! लुटालूट, मारहाण, खून, दरवडे हेच ज्यांचे वंशपरंपरेने चालत आलेले धंदे, त्यांना शांततेचीं तत्त्वें शिकवून ‘माणसाळण्या'चा प्रयत्न केला तर त्यांत यश कितीसें येणार ? महिनाभर कोणत्याही प्रकारचा गुन्हा केला नाही तर त्या माणसाचे वर्तन

मु. २
१७