पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/193

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सी.आय.डी.ची चांभारचौकशी

त्यांत होतो. ती सबंध गाडीच मक्केच्या यात्रेकरूंनी भरलेली होती. सर्वांचे पासपोर्ट तपासून झाल्यावर तो अधिकारी मजकडे आला. इतर इराणी यात्रेकरूंनी मुकाट्याने पासपोर्ट दाखविले; तसाच मीही दाखवावा ही त्याची अपेक्षा! परंतु वरचेवर अधिकारी येत. त्यांतील खरा खोटा कांही तरी तपास करावा म्हणून मी त्याला म्हटले, "तू कोण?" त्याचें उत्तर "सी.आय.डी. ऑफिसर!" असें आलें.
  "तर मग तुझे अधिकारपत्र दाखव," असे म्हणतांच "मी आणलें नाही, घरीं राहिलें," या विद्यार्थ्यांच्या शाळासबबी तो सांगूं लागला. मी पासपोर्ट दाखविण्याचे नाकारतांच त्याने एक रेल्वे पास खिशांतून काढला. त्यावर त्याचे नांव व हुद्दा लिहिला होता. त्याला नांव विचारले, पासावरील व तें नांव जमतांच मग माझा पासपोर्ट त्याला दाखविला.
 आमचे हे भाषण हिंदींत चालले असल्याने ‘सहचारी' इराण्यांना कळलें नाही. "काय झाले?" अशी त्यांची पृच्छा आल्यावर त्यांच्या पैकी एकानेच त्यांना उत्तर दिले. "आपल्या सर्वांचे पासपोर्ट त्याने पाहिले, तर त्याचा पासपोर्ट आपल्या हिंदी दोस्ताने तपासला. ठीक झालें! वः! वः! वः!"

 पण तो सी.आय.डी. अधिकारी जरा जास्त विचक्षणा करणारा दिसला. मी मुसलमान यात्रेकरूंबरोबर प्रवास करतों, तेव्हा मुसलमान असलों पाहिजे अशी त्याची भावना. आणि इतर उतारूंनाही तसेंच वाटे, पासपोर्टवरील संपूर्ण नांव लिहून घेत असतांनाच त्याच्या लक्षांत आले की, हा गृहस्थ कांही मुसलमान नव्हे. वास्तविक हिंदु वा मुसलमान हा धर्मप्रश्न त्याला लिहून घ्यावयाचा नव्हता. पण फाजील चौकसबुद्धि म्हणतात तशी त्याची होती. त्यांतून तो पडला पंजाबी.

१८७