पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/192

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

तीही नको म्हणतांच मग अतिशय उंची अशी जहाल मदिरा त्यांनी मागविली. त्यांची समजूत अशी की, नेहमीच उच्चवर्णीयांत वावरण्याची सवय असल्याने दारू अथवा चहा अशा पेयांकडे हे महाशय ढंकूनही पहात नसावेत. पण त्यांना मी समजावून सांगितलें की, दुधाशिवाय किंवा पाण्याशिवाय मी दुसरें पेय कधीच घेत नसतों. तें तर त्यांना खरे वाटेना. "छे, असें कधी झालें आहे काय? हें पहा आम्ही घेतों." असें म्हणून त्यांनी भराभर पेले घशांत ओतावेत व मी नको नको असें सांगावे. असा फार्स बराच वेळ झाल्यावर तेथे एक म्हातारा होता, त्याने मध्यस्थी करून आग्रहाचा मारा बंद पाडला. "अद्याप या पाहुण्यांना शराबाची चवच कळलेली दिसत नाही; नाही तर ते स्वस्थ कधीच बसले नसते." असें सांगून त्याने दुसरे खाद्य पदार्थ आणण्यास सांगितले. "मी शाकाहारी असल्याने इतर मांसमय पदार्थ खाणार नाही." असें सांगितल्यावर ते इतके जोराने हसले की, मला प्रथमतः मी फार्सी बोलण्यांत मोठी चूक केली असें वाटलें. म्हणून "काय चुकलें?" अशी पृच्छा करतांच डॉक्टर म्हणाले, "अहो शाकाहारी मनुष्य आम्ही आजपर्यंत पाहिला नाही. शाकाहारी म्हणजे काय? असें रहाणे शक्य तरी आहे काय?" त्यांच्या या प्रश्नास उत्तर देणें फार कठीण होतें. मोठ्या मुष्किलीने त्यांच्या समवेत दोन अडीच तास घालवून व त्यांना निराश करून मी निघालों.

  *
*
  • *

 क्वेट्टयाजवळ येत असतां वाटेंत आमच्या गाडीत सी.आय.डी.चे अधिकारी तीन चार वेळां आले व पासपोर्ट पाहून प्रत्येकाचें नांवगाव टिपून घेऊन गेले. अशांपैकीच एक अधिकारी आमच्या डब्यांत शिरला. इतर पंचवीस तीस मुसलमान यात्रेकरूंच्या समवेत मीही

१८६