पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/185

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इराणांतील अफीमबहाद्दर

अस्त," (हिंदुस्थान फार फार चांगले आहे). कोणी म्हणे की, तुमच्याकडे गॅर्मी (उष्णता) फार आहे, इथल्यासारखें बर्फ नाही, म्हणून हिंदुस्थान चांगलें. दुसरा एक म्हणाला, “छे, छे, तिकडे आबादी (वस्ती) पुष्कळ आहे." तिसरा सृष्टिसौंदर्याचा भोक्ता होता. हिंदुस्थानमध्ये जिकडेतिकडे ‘सब्ज'(हिरवें) दिसतें. मनाला आनंद होतो असें त्यानें सांगितले. पण ‘बीचमें मेरा चंदभाई'वालाही एक होता. "तुमच्या देशांत 'सुर्ख फिलफिल' मूठ मूठ भरून खातात नाही ?" हा प्रश्न ऐकून प्रथमतः मी बुचकळ्यांतच पडलो. 'सुर्ख' म्हणजे लाल किंवा तांबडे. फिलफिल हा शब्द काळीं मिरीं असतात त्यांना लावतात. इराणी आहारांत मिरची मुळीच नसते. थोडीशी मिरपूड जशी पाहिजे तशी ज्यानें त्यानें घ्यावी असा तिकडील रिवाज. तेव्हा 'लाल मिरपूड' म्हणजे 'मिरच्यांचें तिखट' भस्कापुरी-हा अर्थ अभिप्रेत होता. "येथे तुमचे 'सुर्ख फिलफिल' वाचून कसें चालतें? तुमचे जवळ असेल तर आम्हांला थोडेंसें दाखवा तर खरें?" असें म्हणून ते माझ्या मागे लागले. इतरांना तर अत्यंत आश्चर्य वाटले. चार जणांच्या एका जेवणास फार फार तर एक गुंजभर मिरपूड खपते आणि हिंदुस्थानी लोक मूठ मूठ भरून खातात हेंं काय प्रकरण आहे, असें त्यांना वाटलें. 'लाल मिरीं कशीं असतात तें पहाण्याचेंही कुतूहल होतेंच.

 त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिले ते मर्मी भिडणारेंच होते. "तुमच्या कडील लोक अफू ओढतात तसेच आमच्याकडे 'सुर्ख फिलफिल' खातात." असे मी सांगतांच तो विषय बदलला! कारण इराण्यांना अफूचे व्यसन जबरें. एकेका दिवसाला तीन तीन चार चार तोळे अफू ओढणारे धूम्रपानपटू तिकडे पुष्कळ आहेत. पुरुषाच्या या

१७९