पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/183

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नादिरशहाने नेलेलें सिंहासन

लूट एका दालनांत व्यवस्थित रीतीने मांडून ठेवलेली आहे. आणि इराणांत असलेली बहुतेक संपत्ति आमच्या सुवर्णभूमीतूनच नाही का गेली? तेव्हा तें दालन पहाण्यांत विशेष महत्त्व व उत्सुकता होती.
 गेल्याबरोबरच नयनमनोहर, रत्नजडित व सुवर्णमंडित असे एक आसन दिसलें. "चीऽस्त?"(हे काय?) असा प्रश्न बरोबरच्या अधिका-यांना विचारताच त्यांनी सांगितले की, “तुमच्या देशांतून नादिरशहाने आणलेलें तख्त! 'आमच्या देशांतील' म्हणून थोडासाच अभिमान वाटला. पण त्यापेक्षाही अधिक शरम वाटून मुकाट्याने मान खाली घालून पुढे चालूं लागलों! दिल्लीचें नामांकित मयूरासन तें हेंच. त्यास तेहरानमध्ये तख्त-इ-नादिर'-(नादिरचें सिंहासन) असे म्हणतात. त्याच्या जोडीचे मूल्यवान आसन जगांत अन्यत्र नाही!
 कोणत्याही प्रकारें अपमान करण्याच्या हेतूने ते बोलले नव्हते; कारण तेहरानमध्ये दोनतीन विद्यार्थ्यांनी मला त्याच अर्थाचे प्रश्न केले होते. “काय हो, तुम्ही हिंदुस्थानांतून आलां ना? आमच्या नादिरशहाने पुष्कळ मूल्यवान लूट आणली, ती तुमच्याच हिंदुस्थानांतली, खरें ना???" अशा प्रश्नांवरून त्यांच्या मनःस्थितीवर राजकीय गोष्टींचा परिणाम किती झाला आहे हें कळून येईल. आकड्यांवरूनच पाहिलें तर, साक्षरतेचे प्रमाण हिंदुस्थानांत इराणपेक्षा अधिक आढळेल; परंतु आपल्या पूर्व पराक्रमाची यथार्थ जाणीव व स्मृति कोणाला आहे ? 'मी हिंदी' असें म्हणण्यास कचरणारे हरीचे लाल आपणांत थोडथोडके का आहेत? असो.

  *
*


 हमादान येथील एका शाळेत गेल्यावर सहासात वर्षांचा मुलगा भेटण्यासाठी आला, "मीही हिंदी आहे. तुम्ही भेटलां म्हणून मला

मु.१२
१७७