पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/182

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

परिचयामुळे फारसें महत्त्व देत नाही हें होय. परंतु इराणांत त्याच पिसांना भारी किंमत. 'हत्ती दारांत झुलणें' हे जसे आपल्याकडील श्रीमंती वैभवाचे लक्षण, तसेच इराणी जनतेच्या मताने 'दारांत मोर नाचणें' ही ऐश्वर्याची परमावधी. आणि म्हणूनच इराणी शहान्शहाच्या तेहरानमधील राजप्रासादांत एक मोराचें जोडपें मोठ्या खटपटीने पाळण्यांत आलेलें आहे.
 मयूराला इराणी प्रजेने इतकें श्रेष्ठत्व आजकाल दिलें असें नव्हे. त्यांच्या कडील अत्यंत मूल्यवान् रत्नजडित 'सिंहासनाला'ही ‘मयूरासन' ('जांभळ्या' पीतांबरापैकींच हा प्रकार झाला!) असेंच संबोधण्याचा प्रघात आहे. इस्फाहान शहरी तयार झालेलें पुराणिकांच्या व्यासपीठासारखें एक राजासन तेहरानमधील राजवाड्यांत ठेवलें आहे. त्याला 'तख्त-इ-ताऊस' (मयूरासन) असें म्हणतात, म्हणून सांगितल्यावर "मयूर तर कोठेंच दिसत नाही हें कसें???" असा मी प्रश्न केला. तख्ताच्या कोपऱ्यावर दोन चिमण्या- लहान मुलांच्या पाळण्यावर टांगतात त्यांसारख्या-दाखवून तेथील अधिकारी मला विचारू लागला की, “हे मोर नव्हेत की काय? तुम्ही अजून मोर पाहिले नाहीत?" इराणी तख्तावरील सोन्याचे मढविलेले व वर मोहक रंग भरलेले 'चिमणी मोर' मी प्रथमच पाहिले खरे!

 इराण्यांच्या नेहमीच्या वागणुकींतही राजकीय विचार पाहून प्रथमतः आश्चर्यच वाटतें. शिक्षणाचा प्रसार नाही, वर्तमानपत्र फक्त शहरांच्या ठिकाणींच, दळणवळणाची तुटपुंजी साधनें, अशी प्रतिकूल परिस्थिति असतांही इराणी जनतेच्या दृष्टींत नेहमी राजकीय प्रश्न कसे येतात हें कोडें पडतें. तेहरानधील एका राजवाड्यांत आजपर्यंतच्या इराणी लुटारूंनी–तेथील शहा म्हणजे लुटारूच–आणलेली

१७६