पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/179

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पंचम जॉर्जाचा रेझाशहास नजराणा

झालेलें असतें. अर्थात् अशा मुखोद्गत वर्णनांत वस्तुस्थितीपेक्षा काल्पनिक इष्टतेचा भागच अधिक असल्यामुळे जे फिरस्ते लेखक 'परप्रत्ययनेयबुद्धी'वर विसंबून राहिले त्यांची हास्यास्पद स्थिति झाली तर त्यांत आश्चर्य कसले? असो.
 इतर दालनांत कलाकौशल्याचे प्रदर्शनच मांडलें आहे असें म्हटले तर त्याचें यथार्थ वर्णन होईल. निरनिराळ्या देशांतून आलेल्या नजराण्यांत सर्वोत्कृष्ट कारागिरी दिसून येणारच. फ्रान्समधून आलेल्या चिनीमातीच्या भांड्यांवर सोनेरी रंगांत चक्रवर्ती नेपोलियनचें चरित्र चित्रित केलें आहे! इटालियन कारागिरांनी नैसर्गिक रंगांत काढलेली चित्रें टांगून ठेवलेलीं पाहिलीं, म्हणजे काय उत्तम तैलचित्र आहे असें वाटतें; पण जवळ जाऊन हात लावल्यास तें चित्र लहान लहान दगड रचून केले असल्याचे दृष्टोत्पत्तीस येतें! लहान लहान दगड निरनिराळ्या रंगांचे अशा खुबीने एकत्रित केले आहेत की, ते सांधले असल्याचें कळतही नाही व तें एकच एक तैलचित्र असल्याचा भास होतो. ‘अक्रॉपोलिस, ‘कलोसियम', ‘रस्त्यांतील देखावा' हीं व अशींच दुसरीं चित्रें दगडांची केलेलीं आहेत.

 हल्ली राज्यारुढ असलेल्या रेझाखान शहास आलेल्या कांही नजराण्यांचे महत्त्व आपल्या दृष्टीने विशेष आहे. रेझाशहाच्या राज्यारोहणप्रसंगी ब्रिटिश सम्राट् पंचम जॉर्ज यांनी दोन मोठे सुवर्ण-कलश, त्यांवर देणाराचे व घेणाराचें नांव कोरून, पाठविले आहेत. अमानुल्ला युरोपसंचार आटोपून स्वदेशीं परत जात असतां वाटेंत तेहरानमध्ये उतरला होता. तेव्हा त्यानेही रेझाशहास, चांदीचा ‘केशभूषा' रचण्याचा संच सप्रेम अर्पण केला असें दिसतें. तीच या संग्रहालयांत तेव्हा शेवटची भर होती. आतां त्यानंतर आणखीही काही वस्तु आल्या असतीलच.

१७३