पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/173

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ही मयसभा तर नव्हे ?

तेथील व्यवस्थेला काय पहावयाचें आहे! ठिकठिकाणचे स्वच्छोदकाचे हौद, पाट, कारंजी आणि मनोहर व चित्रविचित्र पुष्पलता इत्यादि पहातांच आपण दुःखमय संसारांतून निघून नंदनवनांत विहार करीत आहोत की काय, अशी क्षणभर भावना झाल्याशिवाय रहात नाही!
 खुद्द राजवाड्यांत हल्ली शहाचें वास्तव्य नाही. मोठमोठ्या दरबारासाठी किंवा इतर समारंभांचे वेळीं तेवढा शहा तेथे येतो. त्यामुळे सर्वत्र कड्याकुलुपे मोहोरबंद केलेलीं दिसतात. बाहेरून इमारत पहाणारास हा राजवाडा असेल असें क्वचितच वाटेल. कारण त्याचें बाह्यांग अगदी साधारणपैकीच आहे. परंतु आंत प्रवेश केला की, राजगृहाची जाणीव क्षणोक्षणी होऊं लागते.
 इराणी दृष्टीने इमारती व दिवाणखाने सजविण्यांत गालिचे व आरसे यांचा फार उपयोग आहे. केवळ भूमिभागावर आंथरण्यासाठीच गालिचे वापरले जातात असें नव्हे, तर भिंती सुशोभित करण्याकरितांहीं गालिचे उपयोगांत आणतात. म्हणून गालिचे दोन प्रकारचे तयार करतात. एक प्रकार भिंतींवर टांगण्याचा व दुसरा जमिनीवर पसरण्याचा. यांपैकी दुसरा जास्त मजबूत असतो तर, पहिल्यांत कामगिरी व मोहकपणा हीं अधिक आढळतात.

 राजवाड्याच्या मुख्य भागांत प्रवेश केल्याबरोबर आपण सहजच चकित व सस्मित होतों! कारण समोरच आपले प्रतिबिंब दिसून कोठल्याही बाजूस पाहिलें तरी आपल्या पूर्ण परिचयाची मूर्ति आपणांकडेच स्मितयुक्त मुद्रेने पहात असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते! पुढे जिना चढूं लागतांच चढणारे नुसतेच दोन पाय दिसतात! जरा वर पाहिले तर केवळ शिरोभागच नजरेस पडतो! या सर्व विचित्र देखाव्यामुळे

१६७