पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/172

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परिशिष्ट पहिलें : मयूरासन
 इराणी शहाचा जामदारखाना जगांत बऱ्याच श्रेष्ठ दर्जाचा ठरतो यांत शंका नाही. त्या संपत्तिभांडारांत जशी अमोल रत्नें आहेत, तशीं तर अन्यत्र कोठेच नाहीत असें म्हणतात. ही सर्व संपत्ति इराणने बहुतांशी लूट करून मिळविली हें विशेष. किंबहुना हल्ली इराणी राजनगरीत असलेले पुष्कळसे वैभवशाली जवाहिर आमच्या ‘सुवर्णभूमी'तूनच लुटून नेलेलें आहे! नादिरशहा हा इराणचा सर्वांत मोठा लुटारू. त्याने अठराव्या शतकांत हिंदुस्थानवर स्वारी करून किती अपार संपत्ति लांबविली हे इतिहासज्ञांस विदितच आहे.
 हा तेहरानमधील इराणी शहाचा जामदारखाना व तेथील पदार्थसंग्रहालय पहाण्यास सहसा कोणास परवानगी नसते. याचें कारण बहुधा असें असावें की, 'आमच्या वैभवाचे हे प्रदर्शन' दाखवीत असतां आमची लूट करण्याची सवयच प्रेक्षकांच्या मनावर अधिक ठसावयाची! पण दरबारांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून राजवाडा व त्यांतील अमूल्य वस्तु पहाण्याची अनुज्ञा मिळविल्यावर कोणासही क्षणभर कृतार्थ झाल्यासारखें वाटल्यास त्यांत काय नवल?

 गुलिस्तान राजवाडा तेहरान नगराच्या मध्यावर आहे. तेथे पूर्वी 'शहान्शहा' रहात असत. अर्थात् त्यांचा दरबार तेथेच भरे. दरवर्षी 'सलाम' तेथेच होई; आणि त्यांची राजकारणी खलबतेंही तेथेच चालत. वाड्यांतील अनेक दिवाणखाने व महाल, मोठें आंगण व प्रशस्त बगीचा यांना साहजिकच विस्तीर्ण आवार लागणार आणि 'गुलिस्तान'चा विस्तार तसा प्रचंडच आहे. इराणी लोक जात्याच बागबगीच्याचे षोकी, त्यांतून ही शहानशहाची बाग पडली, मग

१६६