पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/171

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सर्वांत लांब बोगदा

बेट कसें आलें याची कारणमीमांसा समाधानकारक रीत्या कोणासच देतां येत नाही. बलुचिस्तानचे पूर्वीचें नांव ‘बोलेदिस्तान' असे असावे. बोलेदी जात तेथे अजून आहे. आपल्या इच्छेविरुद्ध विश्वामित्र आपणांस मारहाण करून वसिष्ठाश्रमांतून घेऊन जातो ह्या उन्मतपणामुळे संतप्त झालेल्या 'सुरधेनु नंदिनी'ने "पुच्छापासुनि केले प्रकट तिनें म्लेंच्छ यवन शबर शक।" असे वर्णन आहे. त्यांतील 'शक' लोक हे बलुचिस्तानांतीलच असे तज्ज्ञांचे मत आहे. 'बेलू' म्हणून एक जुने अधिकारी अभ्यासी आहेत. ते म्हणतात की, 'नाग' आणि 'गरुड' अशा दोन प्रकारचे लोक हिंदु पुराणांत वर्णिलेले आहेत. त्यांपैकी 'गरुड' प्रचलित कालीं बलुचिस्तानांत बदललेल्या स्वरूपांत-म्हणजे धर्म, जात, धंदा बदलून गेल्यामुळे अगदीच निराळ्या स्वरूपांत-अवशिष्ट आहेत.
 खनिज संपत्ति या प्रांतांत विपुल आहे; पण रेल्वेच्या साधनाभावी तिची भूगर्भातून सुटका होणें कठीण झालें आहे. तरी कोळसा, क्रोमाइट हीं द्रव्यें सध्या बाहेर पडत आहेत,
 क्वेट्टा ते चमन हा नव्वद मैल लांबीचा रेल्वेचा फाटा अफगाण सरहद्दीवर जाऊन पोहोचतो आणि सुमारें दोन मैल लांबीचा एक बोगदा याच रस्त्यावर आहे. सर्व हिंदुस्थानांत सर्वात लांब असा हाच बोगदा असल्याचें अधिकारी सांगतात. मुंबईहून बोटीने कराची व नंतर क्वेट्टयाला जाणारी गाडी किंवा बी.बी.सी.आय. मार्गाने मारवाड जंक्शनवरून सिंध-हैद्राबादमार्गाने क्वेट्टा असे दोन रस्ते बलुचिस्तानच्या राजधानीस जाण्याचे आहेत.

-केसरी, ता. ९ जुलै, १९२९.
 

१६५