पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/165

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

गुलाब फुलांची रेलचेल

आणि ते भाडेंच म्हणावयाचे. खानाला ती खंडणी देतात अशांतला भाग नव्हे. मात्र खानाच्या मनांत भाडोत्री जागा परत मागण्याचें आलें तर ती त्याला पहावयास तरी मिळेल की नाही कोण जाणें.
  ब्रिटिश बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा ही आहे. क्वेट्टा हें नांव उच्चारण्यास कठीण व कठोर आहे. बलुचिस्तानचा भाग हिंदुस्थानपासून दूर व तुटलेला आणि तिकडे जातांना सिंधच्या रूक्ष अशा वाळवंटांतन जावें लागतें. या सर्व कारणांमुळे क्वेट्टा कसलें तरी भिकारडें गाव असावें अशी कल्पना होते. पण ती अत्यंत चुकीची आहे, हे एका दिवसाच्या अनुभवानेही कळणारें आहे. उद्यानमय शहर, समुद्रसपाटीपासून ५८५८ फूट उंची, आजूबाजूंस वृक्षहीन टेकड्या आणि सदैव उत्तम हवा यांनी तर क्वेट्टा मनोहर ठरतेंच. पण फुलाफळांची रेलचेल पाहूनही क्वेट्ट्यासारखें दुसरें शहर नसेल असें वाटतें. उन्हाळ्याच्या प्रारंभी तेथे गुलाबांची इतकी पैदास होते की, जिकडे तिकडे पहावें तों गुलाबांशिवाय दुसरे फूल दिसत नाही. खासगी बंगल्यांना किंवा घरांना आवार म्हणून गुलाबांची झाडें लावतात, आपल्याकडे श्रावणाच्या आरंभीं लाह्या भाजून देण्यासाठी भडभुंज्यांच्या भट्टया जशा लागतात तशा गुलाबपाण्याच्या भट्टया क्वेट्टयास लागतात आणि उच्च दर्जाचें सुवासिक गुलाबपाणी, गुलाबी अत्तर आणि गुलकंद इत्यादि बादशाही पदार्थ तेथे तयार होतात. कंदाहारकडून गुलाबफुलांच्या 'वाघिणी' भरून येतात; तेव्हा तर शहरांत दुसरा वासच येत नाही. अफगाणिस्तानांतील गुलाब विशेष सुवासिक असतो.

  क्वेट्टा येथे बदाम, अक्रोड, तुती यांचींही झाडें असून इतर सर्व प्रकारचीं फळें त्या त्या मोसमांत पुष्कळ मिळतात.

१५९