पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/150

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

असें ठरविलें. एकदा खाली मंडळी उतरली की, मग तो मेंढरांचा कळप पुनः कोंडवाड्यांत हाकण्यास निदान तास दीड तास जाई. शिवाय आहारासाठी एक दोन वेळा मुक्काम दिवसा करावा लागेच. इतका वेळ जाऊन मोटार सुरळीत चालल्यास आमच्या प्रवासाची प्रगति व्हावयाची!
 धर्मनिष्ठांचा उपयोग संकटहरणाचे कामीं बराच झाला. एखादा मोठा खळगा आला किंवा ओढ्यांतून पलीकडे जावयाचे असले म्हणजे सर्व यात्रेकरू एकस्वराने 'पैगंबरा'चा धावा करीत, आणि संकटांतून सोडविण्याची विनंती त्याला करीत. त्यांचा तो अल्लारसुलिल्लाचा 'इल्लागुल्ला' कर्णकटु वाटे. पण करता काय ? मुसलमानी राज्यांत असल्याने ते सर्व निमुटपणें सोसावें लागलें.
 इराणांत खनिज संपत्ति किती आहे याचा अंदाज याच प्रवासांत आला. डोंगराचे हिरवे, तांबडे, पिवळे, पांढरे असे वेगवेगळे रंग दिसत. कारण तेथील माती अथवा दगड त्या त्या रंगांचे आहेत. कित्येक ओढे अगदी खारट पाण्याचे असून त्यांच्या बाजूने शुभ्र मिठाचे मोठमोठे ढीग आढळत. जमिनीवर ठिकठिकाणी पांढरा पातळ थर पसरलेला असे तो मिठाचाच! गिरिपृष्ठभाग कांही ठिकाणी काळाकुट्ट दिसून दगडी कोळशाचे अस्तित्व सुचवी तर, मधूनमधून चम् चम् करणाऱ्या टेकड्या अभ्रक असल्याची साक्ष देत.

  आमचा प्रवास दिवसा होई आणि रात्रीं एखाद्या उपहारगृहांत वास्तव्य करावें लागे. 'काहवाखाना' असे नांव इकडील उपहारगृहांना असतें. तेथे सर्व खाद्यपेय पदार्थ तर मिळतातच, पण उतारूसाठी निजण्याबसण्याचीही सोय केलेली असते. मोटारींची वाहतुक वाढल्यामुळे अशा काहवाखान्यांस साहजिकच तेजी आली आहे.

१४४