पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/15

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अटकेने केलेली अटक

जिल्हा. परंतु नुकतेंच जिल्ह्याचें ठिकाण 'कॅंबेलपूर' येथे नेल्यामुळे अटकेचे महत्त्व कमी होत चालले आणि दिवसानुदिवस ते गांव ओस पडत आहे. वायव्यसरहद्दीला लागूनच हा गांव असल्याने येथे मुसलमानी पठाणांची वस्ती पुष्कळच आहे. अटक गांवांत आज पांच सहाच हिंदु घरें आहेत. यावरून मुसलमानांचे आधिक्य किती आहे हें समजेल. किल्ल्याच्या आजूबाजूची एकंदर वस्ती सुमारें तीन हजार आहे. त्यांत हिंंदूची दहांपेक्षा अधिक घरें नाहीत.
  असो. अशा परिस्थितींत मराठ्यांच्या अतुल पराक्रमाचे स्मारक केलें असतें तरी राहिलें नसतें. आमचा इतिहास पूर्वजांनी लिहून न ठेवल्यामुळे आज आम्हांला किती तरी अडचणी येत आहेत. आणि अटकेला आज जर स्मारक झाले नाही तर एकदोन पिढ्यांनंतर अटकेला मराठे गेले होते की काय याविषयीच मोठा वाद माजेल!

 अटकेचा किल्ला इ. स. १५८१ मध्ये अकबराने बांधला. त्याच्या उत्कर्षाला येथे 'अटकाव ' झाला म्हणून त्याने 'अटक' हे नांव ठेवलें, ते यथार्थच ! कारण पुढे मराठ्यांनी तो किल्ला काबीज करून मुसलमानांच्या लुटारू वृत्तीस 'अटक' केली. तसेच इ. स. १८१२ मध्ये रणजितसिंगानेही तेंच कार्य साधलें. इ. स. १८४९ मध्ये हा किल्ला जेव्हा ब्रिटिशांकडे कायमचा गेला तेव्हापासून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला अटकाव झाला हे तर प्रसिद्ध आहे. असा हा अन्वर्थक किल्ला सिंधूच्या पूर्वतीरावर असून लष्करी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. दिल्लीहून येणारा रस्ता व पेशावरचा मार्ग हे दोन्ही या अटक किल्लयांतून अशा युक्तीने रोखतां येतात की, फार सैनिकांचीही आवश्यकता लागत नाही. ज्याच्या हातांत अटक तो पेशावरचा स्वामी झालाच असें मानण्यांत मुळीच प्रत्यवाय नाही. पेशावर येथून केवळ सत्तेचाळीस मैल,