पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/149

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.संकटहरणार्थ पैगंबराचा धावा

त्यांनी तपासणी करावयाची नाही असा निश्चयच केलेला दिसला. जेव्हा कांही मोडतोड होई तेव्हाच तिकडे त्यांचें लक्ष जाई. संसारांत राहून विरक्त रहाणारास पद्मपत्राची उपमा देतात. तो प्रघात सोडून त्या ठिकाणीं इराणांतील मोटारहाक्याची उपमेसाठी योजना करावी. मोटारींत असूनही जशी कांही मोटार आपली नव्हेच या भावनेने त्यांचे वर्तन असतें. आडरानांत किती तरी मोटारी अडकून पडल्या होत्या. कोणाजवळ हवा भरण्याचा पंप नाही, तर कित्येकांचे पेट्रोल संपलेलें. कांहींजवळ तर नेहमी आवश्यक असणारी हत्यारेंही नव्हतीं. अशा अगदी साध्या क्षुल्लक बाबींसाठी उतारूंचे हाल होत. कोठे तरी मोटार अडली म्हणजे ती पुढे जावी कशी ? उतारूंंना दुसरीकडे जातां येत नसे. तेव्हा मनोभावाने मोटारहाक्याबरोबर तेही जिवापाड परिश्रम करीत. जितकें काम लवकर होईल तितका त्यांचा प्रवास जलद संपणारा असल्याने ते धडपडत. पण यांत्रिक अगदी निर्विकार दिसे. त्याला त्याचें कांहीच वाटत नसे.

  इराणांत वाहतुकीची साधनें नुकतीच उपलब्ध झालीं असल्याने त्यांचा फायदा प्रथमतः व्यापारी घेतात हें खरें. पण बहुतेक उतारू यात्रेसाठीच हिंडत असतात. इराणी हे शिया पंथाचे मुसलमान. तेव्हा इराकमधील 'करवला' या ठिकाणीं जाण्याची त्यांची उत्कट इच्छा असणारच. मशहद ही अत्यंत महत्त्वाची यात्रेची जागा असल्याने धार्मिकांची तेथे अत्यंत गर्दी जमते. मशहदचे माझ्याबरोबरचे उतारू सर्व यात्रेकरूच होते. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे फाजील धर्मवेडाने वेडावलेली ती मंडळी होती. दिवसा तीन चार वेळ प्रार्थनेसाठी मोटार थांबविण्याची त्यांची ओरड असे. पण मोटारहाक्याशीं संगनमत करून केवळ दोन वेळच प्रार्थनेसाठी मोटार थांबविली जाईल

१४३