पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/136

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

पाक्षिक व्यवसायांत घालावयाचे हा होय! थंडी अतिशय हें तर कारण खरेंच; पण दुसरें म्हणजे योग्य सोय नाही. येथील स्नानगृहें अगदी वेगळीं असून कोणत्याही अभ्यागतालयांत म्हणजे हॉटेलांत स्नानाची व्यवस्था नसते. त्यासाठी ‘हमाम' म्हणून स्वतंत्र स्नानगृहेंच असतात. या हमामांत जावयाचें म्हणजे एक शिक्षाच म्हणावी लागेल. पण तीनचार वेळां गेल्यावर तेथे जाणें ही एक चैनीची आवश्यकता होते. चोहो वाजूंनी अगदी बंद केलेल्या खोलीस खालून उष्णता लावलेली असून तिच्यांत मधूनमधून वाफ सोडतात. अशा ठिकाणी जाऊन प्रथमतः तेथील सेवकांकडून सर्वांग घासून, धुऊन, पुसन, रगडून घ्यावयाचे आणि मग उष्णोदकाने स्नान करावयाचें, अशी रीत आहे. अशा हमामांत एकदा स्नान केलें की, साधारणपणे शेर अधशेर वजन कमी होतें आणि नेहमीचे कपडे अगदी सैल वाटावयास लागतात. घासूनघासून शरिराचें वरचें कातडें निघून जातें, सर्व रक्तवाहिन्यांना चेतना प्राप्त होते. निदान एक तासभर हें 'रासन्हाणे' चालतें. दोनदोन तीनतीन तासही सेवा करून घेणारे 'हमामबहाद्दर' असतात. पण नवीन आलेला मनुष्य कोंडलेल्या हवेमुळे गुदमरून जातो आणि घेरी आल्याप्रमाणे त्याला वाटूं लागतें! आठवड्यांतून किंवा महिन्यांतून एकदा स्नान व्हावयाचें तें असेंच असले पाहिजे! मुंबईतील चौपाटीवरील 'चंपी'च्या जोडीला उष्णोदक स्नान दिलें म्हणजे हमामाची कल्पना येईल. इराक, इराण, तुर्कस्तान इकडे सर्वत्र अशा हमामांचीच रीत आहे. पूर्वीच्या काळीं त्या ठिकाणीं नैसर्गिक उष्णोदकाचे झरे असत. तेव्हा त्यांना औषधी गुणांमुळे महत्त्व असे. पण हल्ली अशीं उन्हाळीं इराणांत कांही ठिकाणीं असलीं तरी शहरांतील हमामांत साधेंच पाणी येतें.

१३०