पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

आहेत किंवा गटारें व पाणी नेण्याचे पाट हे प्रवाह निरनिराळे नाहीत असें पाहिजे तर म्हणावें! अशा गटारांची द्वारे रस्त्यांत हिंडतांना नेहमी लागतात आणि लक्ष दुसरीकडे असणारा त्यांत पडावयाचा देखील! कारण ज्याला 'पाणी' पाहिजे असेल त्याला ते द्वार उघडता येते. पण काम झाल्यावर तें पुनः पूर्ववत् झाकावें याविषयी विचार तो मुळीच करणार नाही. रस्त्यावर शिंपडण्यास, जनावरांना पाजण्यास किंवा पिण्याखेरीज सर्व उपयोगासाठी अगदी बिनदिक्कतपणे तें पाणी घेतांना पाहून हिंदुस्थानांतील कोठल्याही मनुष्यास साहजिकच किळस वाटेल. पण येथे ‘तीर्थदकं च वन्हिश्च नान्यतः शुद्धिमतः' हें वचन अगदी आबालवृद्धांच्या रोमरोमी भिनल्याप्रमाणे दिसतें. पाणी कधी अस्वच्छ होऊं शकतच नाही असा इराणी प्रजेचा सिद्धांत आहे, का स्वच्छता हा शब्दच त्यांना ज्ञात नाही असा प्रश्न पडतो. पण हा रिवाज आहे. रूढीविरुद्ध एक चकार शब्द काढतां कामा नये, पाण्याचा उघडा पाट असेल तर, एके ठिकाणीं बायका धुणें धुतांना दिसतील व चार पावलांवर कोणी भांडी घांसत असतील. पुढे थोड्याशा अंतरावर 'ग्रामसिंह' आपली तृषा शमन करीत असतांना दिसेल आणि लगेच एखादा चालता बोलता मनुष्य प्रार्थनेसाठी त्याच पाण्याने हस्तपादमुखप्रक्षालन करतांना दिसेल. आणि हें सर्व 'एका मोटेच्या' पाण्याइतक्या मोठ्या पाटांत, अक्षरशः चार चार पावलांवर. एखादीच वेळ अशा काकतालीय न्यायाची असते असें नव्हे, तर हीं दृश्यें नेहमीचीं-रोजचींच आहेत आणि त्यांबद्दल त्रयस्थांविना इतरांस कांहीच वाटणार नाही.

  सहभोजनें केल्याने जाती मोडतील असा कित्येकांचा ग्रह आहे आणि त्या दिशेने प्रयत्न करणारे आपल्याकडे कांही लोक आहेत

१२६