पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/130

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

अधिकाऱ्यांचा आणि बादशहांचा बेसुमार 'जनानखाना'. पण आता ती पद्धति नष्ट होत असल्याने तज्जन्य चालही आपोआपच दूर झाली पाहिजे. हिंदुस्थानांत 'पडदा' आणि 'बुरखा' अशा दोन चाली वेगळ्या आहेत. 'पडदा' असणा-या स्त्रिया 'बुरखा' घेत नसून त्या जेथे जातील त्या स्थानाभोवती पडदा असेल किंवा त्या भागांत पुरुषांना बंदी असेल. आंत वावरणाऱ्या स्त्रिया बुरखा न घेतां हिंडतील. बुरख्याचें तसें नाही. बुरखा घेतला की, मग पुरुषांना धक्के देऊनही जातां येतें असा इकडील रिवाज आहे. पुरुषांनीही रस्त्यावरून जातांना बुरख्याचें काळें निशाण पाहून थोडें स्त्रीदाक्षिण्य दाखवावें अशी अपेक्षा कोणी करीत नाही किंवा 'स्त्रीणां भूषा किं तु सौजन्यमेव' या न्यायाने स्त्रियाही जपून चाललेल्या दिसत नाहीत. अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून 'काळा बुरखा' जाऊं लागला तर त्यांत आश्चर्य केवळ नवीन रहिवाशालाच वाटेल! हिंदुस्थानांत रेल्वेच्या तिसऱ्या वर्गाच्या तिकिट-ऑफिसपाशी तिकिट घेतांना जशी रेटारेटी चालते, तसाच प्रकार इराणी बाजारचे भागांत स्त्रीपुरुष हा भेद न बाळगतां नेहमी चालतो! बुरख्याचा मोठा फायदा एक आहे. त्यापासून इतरे जनांना मुळीच त्रास नाहीं. 'पडदेवाल्यां'ची सरबराई राखणें फार कठीण काम होतें आणि नेहमी निदान तीनचार नोकर चाकर बाळगावे लागतात. पडदा घेण्याची चाल असेल तर सायंकाळी फिरावयास जातांना दांपत्याला मिळून पडद्यांत जावें लागेल. पण बुरखेवाली मंडळी कांही त्रास न होतां जोडीजोडीने तें सुख अनुभवू शकतील. इराणांत बुरखा हा सर्व वयाच्या स्त्रियांना लागू आहे. म्हणजे मुलगी हिंडूं फिरूं लागली की, काळा बुरखा तिच्या पोषाखाचें एक मुख्य अंग–नव्हे अंग झाकण्याचे वस्त्र-होतें.

१२४