पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/128

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

नियमाचा एक फायदा झाला आहे. कापडवाले, शिंपीदादा आणि टोपीवाले यांच्या व्यापाराला चांगलीच बरकत होत आहे. हल्ली आपणांकडे गिरण्यांची हलाखी आहे. तेव्हा असा एखादा नवा कायदा अमलांत आला तर गिरणीमालक सरकारास दुवा देतील!

 स्त्रीवर्गावर कायद्याचें हत्यार अजून चाललें नसलें तरी, पाश्चात्य सुधारणेचा अंमल पडद्यांतही शिरला आहे हे सहज लक्षांत येतें. रस्त्यांत वावरत असलेली काळ्या कापडांत गुरफटलेली 'भुतें' हीं पुरुषवर्गापेक्षा अधिक भरतात असें सांगितलें तर कोणाला आश्चर्य वाटावयास नको. इराणांतील महिलावर्ग हिंदुस्थानांतील कोणत्याही सुधारलेल्या आणि सुशिक्षित अशा स्त्रीसमाजाला 'फॅशन'चे धडे देण्यास समर्थ आहे! तलम तनुवर्णीय मोजे, उंच टाचांचीं पादत्राणे आणि मुद्रारंगसाहित्य इत्यादिकांचा प्रसार आमच्या समजुतीप्रमाणे आणि अनुभवाने केवळ यूरोप, अमेरिका या खंडांतील देशांतच असावा असें होतें. परंतु इराणांत त्यांचा जारीने प्रवेश झालेला दिसला. फक्त काळा बुरखा निघण्याचाच अवकाश, मग इराणी स्त्री कोणती आणि युरोपियन स्त्री कोणती याचा संदेह पडेल! इतकें सांगितल्यावर मग रस्त्यांमधून त्यांचेंच प्राबल्य का असतें हें समजेल. केशभूषा, मौलिभूषा, वेषभूषा इत्यादि पुष्पबाण सज्ज करण्यासाठी बाजारांत स्वतःच जाणें स्त्रियांना इष्ट असते. पुरुषांना एक तर हा असला बाजार करणें प्रथमतः जिवावर यावयाचें; कारण खिसा रिकामा होतो. आणि दुसरें असें की, त्यांनी कितीही धडपड केली तरी ‘घरांत' ती निवड पसंत होईलच असा नियम नाहीं. तेव्हा 'जेनो काम तेनो थाय' हेच खरे, म्हणून इराणी ललना नेहमी बाजारांत हिंडतांना आढळतात. 'ललना स्टोअर्स,' 'वनितावस्त्रभांडार, 'महिला-साहित्यसंग्रह,'

१२२