पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/127

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'टोपी घालण्या'चा कायदा

आपल्यांपैकी कितीही गोरा मनुष्य असला तरी तो तेथे फिक्काच पडावयाचा. इराकमधील अरब देखील इराण्यांच्या मागे पडतात.

 पोषाकासंबंधी कोणी विचारपूस केलीच तर आपण इराणी लोकांच्या मानाने फार मागसलेले आहोंत असें म्हणावें लागेल. कारण आजकाल सुधारणा म्हणून जी कांही म्हणतात ती सर्व कोट, विजार आणि बूट यांतच येऊन बसल्याप्रमाणे झाली आहे. साधारणपणे उच्च अधिकारी अथवा बडे पदवीधरच काय ते आपल्याकडे विलायती–साहेबी–वेषांत दिसतात. ते सुद्धा आपल्या कार्यक्षेत्राबाहेर स्वतःच्या राष्ट्रीय पोषाकांतच आढळतील. पण तसें इकडे नाही. प्रत्येकाला 'सूट' हा हवाच! थंडी कडाक्याची असल्याने बूट व मोजे हे पायांतून बाहेर निघतच नाहीत. गेल्या २१ मार्च पासून नवीन कायदा अमलांत आल्याने परकीय प्रजाजन आणि धर्माधिकारी मुल्ला यांना वगळून सर्वांना पेहेलवी टोपी व विलायती तऱ्हेचे आखूड कोट आणि विजारी सक्तीने घालाव्या लागतात. पेहेलवी टोपी म्हणजे साधी, गोल टोपीच आहे. पण तिला एक पुस्ती जोडलेली असते. डोळ्यांवर थोडीशी छाया पडावी म्हणून टोपीला 'अर्धचंद्र' लावलेला असतो. सदैव डोकें टोपींत खुपसलेलें असते, हा एक मुख्य दोष या शिरोभूषणाचा आहे. दुसरें असें की, साधारणपणे दोनतीन महिन्यांत एक टोपी निकामी होते. तींत साध्या कागदावर कापड चढविलेलें असल्याने टोपीवाल्यांच्या धंद्याला कायमची तेजी आहे. याचा परिणाम सर्वत्र दिसून येतो तो असा की, टोपीवाल्यांचीं दुकाने जेथे तेथे वाढत आहेत. अशा वेळी येथे एखादे 'अनंत शिवाजी' असते तर त्यांनी छानच कामगिरी बजावली असती! कायद्याने प्रजेला 'टोपी घालणे' रास्त असो वा नसो, या नवीन

१२१