पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/124

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

व त्यावरील कोयता आणि हातोडा दृष्टीस पडतात. साम्राज्याच्या पिकाची समूळ कापणी करण्यास रशियन विळा पुढे सरसावतो अशी भीति ज्यांच्या मनांत असेल किंवा साम्राज्याच्या प्रचंड इमारतीचा नाश करणारा रशियन हातोडा टाळला पाहिजे असें ज्यांना वाटत असेल, त्यांना रशियाचें हें निशाण वाईटच दिसणार.

 असो. ठरल्या वेळीं राजेसाहेबांची स्वारी आली. वेत्रधर ललकारीत पुढे चालूं लागले. पहारेकऱ्यांची सलामी झडली. आजूबाजूंस उभे असलेल्या अधिकाऱ्यांचीं डोकीं खाली लवलीं. कॅमेऱ्यांचे क्लिक क्लिक असे आवाज झाले, तोफांची सरबत्ती कर्णपथावर आली. बागेंत रमत गमत हिंडणाऱ्या निवडक प्रजाजनांचे पाय थांबले व वाद्यें वाजेनाशीं झाली. रेझा शहा पेहेलवी ही चाळिशी उलटलेली व्यक्ति आहे. ती अगदी साध्या वेषांत होती. शीर्षभागावर इतर प्रजाजनांची असे तशाच प्रकारची पेहेलवी टोपी होती. डोळ्यांत एक विलक्षण तेज असून चर्येवरील रेखांवर ‘मदायतं तु पौरुषम्' हें कर्णाचें वाक्य अगदी स्पष्ट अक्षरांनी लिहिलेलें दिसे. रेझा शहा हे इतर नामधारी राजांप्रमाणें वंशपरंपरेने राजपुत्र नसून साध्या सैनिकापासून चढत चढत ते इराणचे शहा झाले आहेत. आशियांत अशा प्रकारचीं स्वत:च्या हिंमतीवर राज्यपद प्राप्त करून घेणारीं माणसें पुष्कळच झाली आहेत. पण पेहेलवी शहांचे श्रेष्ठत्व विशेष आहे. त्यांच्या मुद्रेवरील चिंतेची छाया आणि पिकलेले केस यांवरून 'स्वास्थ्यं कुतो मुकुटमारभृतां नराणाम्' या कविवचनाची साक्ष पटे. गजगतीने पडणारे त्यांचे पाऊल राज्यकर्त्यावरील–विशेषतः तेहरानच्या राज्यकर्त्यांवरील जबाबदारीच्या भाराची कल्पना आणून देई. उत्तरेकडून येणारे अस्वल किंवा दक्षिण दिशेला टपून बसलेला सिंह या दोघांनाच ताब्यांत ठेवणें हें किती कठीण

११८