पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/114

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

परकीय देशांतले डोंगर अगदी मागे पडतात. मनांत कसलीच भावना जागृत होत नाही. नीलांबराला सफेत रंग लावण्यासाठी विश्वकर्म्याने नियोजिलेल्या निष्काळजी कारागिराने पातळ चुना भरलेलें भांडें सांडून टाकल्यामुळे सर्वत्र पांढरेंच पांढरे झालें असेल काय? जलवृष्टि करण्याकरिता सहस्राक्षी इंद्राने आज्ञा दिली असतां चुकून क्षीरसागराची तोटी उघडली गेल्यामुळे आकाशांतून दुग्ध गळून तर पडलें नसेलना? अथवा आकाशाला गवसणी घालण्यासाठी लागणारें वस्त्र तयार करण्याच्या प्रचंड कारखान्यांतील हा पिंजलेल्या कापसाचा ढीग तर नव्हे? अशा नाना कल्पना मनांत येतात. मेघगर्जना होऊ लागली म्हणजे लहान मुलांची जिज्ञासा तृप्त करण्यासाठी 'म्हातारी हरभरे भरडीत आहे' असे सांगण्यांत येतें. तीच बालसमजूत दृढ झाली असल्यास म्हातारीने हरभरे दळले, त्याचें पीठ खाली पडलें असें समजावें.असो.

  घाटांतून वर जसजसे जाऊं लागावें तसतसे क्षितिज दूर जातें आणि नवीन नवीन पर्वतशिखरे दृष्टिपथांत येतात. जिकडे पहावें तिकडे बर्फाशिवाय दुसरें कांहीच दृष्टीस पडत नाही. रस्त्यावर तर बर्फ असतेंच; पण दोन्ही बाजूंनी आठ दहा फुटांच्या बर्फाच्या भिंती दिसतात. रस्ता साफ करण्यासाठी कामगार सारखे धडपडत असतात आणि ते नसते तर मोटारींचा मार्ग बर्फमयच झाला असता. या ठिकाणी थंडी किती असेल याची कल्पनाच करावी! घाटमाथा समुद्रसपाटीपासून निदान चवदापंधरा हजार फूट उंच असावी. कारण तेथून किती तरी खाली उतरून हमदानला यावें लागतें. तरी हमदानची उंची ६२०० फुटांपेक्षा थोडी जास्त आहे. पुत्रकामेक्षु स्त्रियांच्या नवसाला पावणारा सिमल्यांंतील बालब्रह्मचारी मारुति ज्या

१०८