पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/111

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रणयी युगुलाचे स्मारक

 खानाकीनपासून सुमारे पंचवीस मैलांवर दुसरा मुक्काम 'कसर-इ-शिरिन' येथे झाला. लैला आणि मज्नून या इराणी प्रणयी जोडप्याचें नांव फार्सी-मराठी कोशकारांनी मराठी वाचकांस परिचित केलेंच आहे. फरहद व शिरीन याही परस्परासक्त युगलाची रम्य कहाणी त्यांनीच सांगणें इष्ट आहे. एक तर ती फार मोठी आहे, आणि दुसरें असें की, फार्सी भाषेच्या अभ्यासकालाच तिचें स्वारस्य दुसऱ्यांस समजावून सांगतां येईल. इतकेंच आता सांगून ठेवावेंसें वाटतें की, रोमिओ आणि ज्यूलिएटप्रमाणेच आषुकमाषकांचे हें जोडपें इराणी जनतेंत सर्वतोमुखी आहे. शिरीन ही राजकन्या होती आणि तिच्याच नांवाने कसर-इ-शिरिन हे नांव ओळखलें जातें. या प्रणयी जोडप्याचें स्मारक चिरकालीन राहील असे कांही अद्भुत प्रकार इराणी लोकांच्या दंतकथेंत आहेत आणि कांही ठिकाणीं तर दगडी कोरीव व खोदकाम फरहदच्या हातून, शिरीनचे चिंतन सारखें चालू असल्यामुळे, घडलेलें म्हणून दाखवितात.

  'कसर'पासून पुढील मार्ग कर्मानशहा नगरीचा. हा दीडशें मैलांचा रस्ता कांही अंतरापर्यंत बर्फमय प्रदेशांतून गेला आहे. रस्ते साधारण असून मोटारींची वाहतूक मात्र सपाटून आहे. कारण इराणांत दळणवळणाचें मुख्य साधन काय तें हेंच! शिवाय आयात जकात यंत्रसामग्रीवर इराणी सरकारने मुळीच ठेवली नाही. म्हणून आधुनिक वाहनांचा प्रसार जारीने वाढत आहे. डोंगराळ प्रदेशांत लहानसान ओढे, नाले असावयाचेच; पण थंडीने त्यांचे सर्व पाणी गोठून जागच्या जागी राहिलेलें दिसे. जलसंचय दिसण्याऐवजी शुभ्र कापड पसरलेले सभास्थान आहे की काय असा भास होई. जागजागी बर्फाचे ढीग पडलेले दिसत आणि डोंगराचा भाग तर पांढऱ्या संगमरवरी दगडाचा आहे असें वाटे!

१०५