पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/109

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
मुक्काम पांचवा : तेहरान
(१५)

 बसरा-बगदाद रेल्वे अगदी सपाट मैदनांतून गेली आहे. ती इतकी की, सुमारे ३२५ मैलांनंतर बगदादची उंची समुद्रसपाटीपासून केवळ ११३ फूट भरते! खजुरीशिवाय दुसरें झाड दृष्टीस पडत नाही, आणि कितीही डोळे ताणले तरी एखाद्या टेकडीचा मागमूसही सापडत नाही. अशा प्रदेशांत प्रवास कंटाळवाणा होतो. मधून मधून कालवे मात्र सपाटून आढळतात. असा प्रवास केल्यानंतर तेहरानला जावयाचे तेव्हा बगदादपुढेही वाळवंट आहे की काय अशी भीति वाटूं लागली. तेहरानचा रस्ता आक्रमण्याची साधनें प्रचलित काळीं तीन उपलब्ध आहेत. 'हवाई जहाजांची फेरी' दर आठवड्यास सर्व इराणभर होते. त्या मार्गे आकाशोड्डाण करणे हे फार सोयीचें असलें तरी आर्थिक दृष्ट्या आणि देशपरिस्थित्यवलोकन करण्याच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीचें होतें. दुसरा मार्ग मोटारगाड्यांचा आणि तिसरा म्हणजे खेचरें, उंट किंवा घोडी यांच्या तांड्यासमवेत जावयाचा. पैकी मध्यम पंथ स्वीकारून बगदादहून निघालों. प्रथमतः खानाकीनपर्यंत रेल्वेने प्रवास केला. बगदादहून हें गांव सुमारें १२० मैलांवर आहे. इराणी आखातांतील आबादान येथे असलेल्या घासलेट तेलाच्या कारखान्याविषयी मागे लिहिलें आहेच. तसाच पण अगदी छोटा असा कारखाना खानाकीन येथे असल्यामुळे या गावास थोडें महत्त्व प्राप्त झालें आहे.

  खानाकीन ऑइल कंपनी म्हणजे अँग्लो-पर्शियन ऑइल कंपनीचें लहानसें पिल्लूच म्हणतां येईल. सर्व व्यवस्था 'मोठ्या' कंपनीचीच असून रेल्वेचा फाटा तेलासाठीच आणला आहे असें म्हटल्यास

१०३