पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/108

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

इराकी राज्यांत प्राधान्य नाही. 'हिंदी' म्हटलेले सर्व लोक एकाच दर्जाचे असें समजले जाते. त्यामुळे इराकमध्ये 'हिंदी' लोक भिन्न धर्मीय असले तरी एकजुटीने आहेत, हा एक मोठा फायदा झाला आहे! वाइटांतून चांगलें निघतें ते असें.
  हिंदुस्थानांत ईजिप्तमधील अरबी पत्रें येतात आणि आपल्या वर्तमानपत्रांतून त्यांच्यांतील सारांश देण्याचा प्रघात कांही ठिकाणी आहे. पण बगदादमधील अरबी पत्रें तिकडे जात नसल्याने हिंदी लोकांविषयी मत्सरग्रस्त फूत्कार बाहेर पडत आहेत. त्यांचा प्रतिध्वनी देखील कोणाच्या कानीं पडणें शक्य नाही. हिंदी व्यापारी बगदादला फार नसले तरी महत्त्वाचे आहेत आणि सरकारी नोकरींतील हिंदी प्रजाजनावरील टीकास्त्राचा ओघ व्यापारी लोकांकडे व स्वतंत्र देशांतील लोकांकडे वळूं लागला आहे. परकीय प्रजाजनांवरच हा हल्ला होतो असें कांही काळ भासलें. ब्रिटिशांवर होणारा वाग्बाणांचा भडिमार हाय कमिशनरने तत्काळ बंद पाडला. पण हिंदुस्थानी प्रजेची दाद घेणार कोण? हिंदी वर्तमानपत्रांनी इकडे लक्ष देऊन आपल्या राष्ट्राचा परदेशीं होणारा दुर्लौकिक थांबविण्याचे उपाय योजावेत. वैयक्तिक दृष्ट्या जितकें शक्य होतें तितके 'केसरी'च्या प्रस्तुत प्रतिनिधीने केलें आहे. आफ्रिका, अमेरिका इत्यादि खंडांत हिंदी जनतेवर सध्या असलेल्या मानहानिकारक निर्बंधांची इराकमध्ये प्रस्थापना चालू आहे आणि वेळींच आमचे पुढारी सावध झाले नाहीत तर त्याच अनिष्ट प्रकारची पुनरावृत्ति होईल.

–केसरी, ता. २३ एप्रिल, १९२९.


१०२