पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उसनवारीची शिधोरी

राज्यास प्रारंभ झाला. इंग्रजी डाव खेळण्यांत कांही काळ गेला असल्याने हिंदी कामगार त्या कलेंत तरबेज झाले होते. त्यांनाच मेसापोटेमियांत पाठविणें सोयीचें होतें. रेल्वे तर बोलून चालून सर्वस्वी हिंदीच. लढाईच्या धामधुमींत युद्भकर्जासाठी हिंदुस्थान सरकारने दिलेल्या ( नव्हे हिंदुस्थान सरकारकडून घेतलेल्या ) सहाय्यांत रेल्वेचें सामान पुष्कळ होतें. अशा इकडून तिकडून मागून आणलेल्या शिधोरीची हंडी इराकी प्रजेवर लादण्याचा प्रयत्न चालू आहे. हा रेल्वेचा गाडा चालता आहे असें दाखविण्यासाठी हिंदी मजुरांचीच भरती करावी लागली. लहान कामगारांपासून तो स्टेशनमास्तर, हिशेबतपासनीस इत्यादि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्व भरणा सरकारने हिंदुस्थानांतून केला. 'इराक रेल्वे' अशीं मोठीं अक्षरें इंजिनांवर आणि डब्यांवर असलीं तरी सर्व माल दोन इंजिनें वगळून जुनाचं आहे. चाकांवर बी. बी. सी, आय. रेल्वे अशीं अक्षरें आजमितीसही वरवर पहाणारास दिसतील.

 इराकी प्रजेच्या स्वाधीन ही मोडकी तोडकी रेल्वे करण्यासाठी इंग्रज मुत्सद्दी बरींच वर्षे खटपट करीत आहेत. परंतु बोळ्याने दूध पिण्याइतकें भोळे मंत्रिमंडळ मेसापोटेमियाचें नाही. पूर्वी सांगितलेल्या किमतीचा आकडा सोडून ब्रिटिश अधिकारी आता जवळ जवळ निम्या रकमेस म्हणजे अडीच कोटींवर आले आहेत. तरीही इराकी मंत्री ती स्वीकारण्यास राजी नाहीत. गेलीं पांच वर्षे रेल्वेची व्यवस्था इराकी मंत्रिमंडळापैकी एका दिवाणाकडे आली. तेव्हापासून हिंदी मंडळींना स्वदेशीं परत रवाना करण्यास प्रारंभ झाला. सध्या अरबी पत्रांतून इराकांत सरकारी खात्यांत काम करणाऱ्या प्रत्येक हिंदी मनुष्यावर नांवनिशीवार टीका होत असून अशा लोकांना हिंदुस्थानांत पाठवावें अशी ओरड चालू आहे.

 मु. ७
९७