वेळीसुद्धा. मीटिंग झाली. लोकं म्हणायला लागले, काय छान बोलतो रे, काय हा माणूस चांगलं बोलतो रे! आम्ही मागं बसलेले असल्यामुळे महंमददा म्हणाले बघा, काकी बघा, काय लोक हमीदबद्दल बोलतात. त्यांना पण खूप कौतुक वाटायचं. त्या मीटिंगनंतर दलवाईंनी मला विचारलं, 'मेहरू, कशी झाली ग मीटिंग? म्हटलं, खूप चांगली झाली. लोक असं असं म्हणत होते. पण मला एक अक्षरही कळलं नाही, तुम्ही काय बोलता त्यातलं. कशाबद्दल बोलला काही कळलं नाही, तुम्ही बोलत होता खूप चांगलं. लोक तुमची तारीफ करत होते. त्यावरून तुम्ही चांगलंच बोलत असाल असं मला वाटलं.' मग आम्ही रस्त्यानं गेल्यानंतर लोक म्हणायचे, 'बघ, बघ, हमीद दलवाई चाललेत, काय छान बोलतात.' हे म्हणायचे, 'बघ तुझ्या नवऱ्याची कशी तारीफ करताहेत, ऐक तू. तुला काहीच वाटत नाही?' असं ते चेष्टा बिष्टा करत विचारायचे.
त्यांचा विषय असे मुस्लिम समाज. मुसलमानांचे राजकारण, समाजकारण हे काय आहे, त्यांचा इतिहास काय आहे, भूगोल काय आहे? ते म्हणत, ज्या माणसाला भूगोल समजत नाही, त्याला इतिहासही कळणार नाही. मुसलमानांची चूक इथंच आहे की त्यांना भूगोल कळलेला नाही. त्यांनी त्याच काळामध्ये पुस्तक पण लिहिलं. अजून ते पुस्तक प्रकाशित झाले नाही.
'इंधन' कादंबरी छापली गेली. महाराष्ट्र सरकारचं पहिलं बक्षीस तिला मिळालं. आणि त्यानंतर गाववाल्यांनी यांना वाळीत टाकलं आणि तिथं गोंधळ घातला, कुळवाडी लोकांना भडकवलं तिकडे. तुमच्याबद्दल हमीदखाननी असं असं लिहिलेलं आहे. त्यामुळे तिथे वाद झाला. दंगल झाली. दोन महिने आमच्या घरावर बहिष्कार टाकला. आमच्या बाबांची दाढी करायला न्हावी येत नसे. डोंगरावर घर होतं. खालून आमच्या बायका पाणी वर न्यायच्या. तर त्यांना गडी मिळत नसे. बायकांचे आमच्या हालच झाले. खूप त्रास झाला. इथे आमच्या घरावर दगडफेक झाली. निनावी पत्रं आली. म्हणजे मारण्याच्या धमक्या आल्या. त्या वेळी मला हे सगळं कळलं ना!
पहिला 'लाट' कथासंग्रह निघाला. रूबीनाच्या वेळेला, ५८-५९ मध्ये. ६६ ला 'इंधन' निघाली. इलाच्या वेळेला. तर तेव्हा मी पुण्याला येणार होते डिलिव्हरीला. ती आलेच नाही. मुंबईत राहिले. घरावर दगडफेक झाली. मारण्याच्या धमक्यांची निनावी पत्रं मला आली. त्याच्यात माझी डिलिव्हरी झाली. गावाची परिस्थिती खूप खराब झाली. मग काय करायचं?