Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/98

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समाजामध्ये काय काय सुधारणा करावीशी आपल्याला वाटते त्यावर चर्चा करायची. हा विचार मनात घेऊन त्यांनी काही लोकांना आपल्याबरोबर घेतलं. आणि ते मोमीनपुऱ्यामध्ये जिथे मुसलमानांची वस्ती जास्त आहे तिथे गेले. पण तिथल्या लोकांनी त्यांच्याशी बोलणं तर लांबच राहिलं पण काठ्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांच्यावर हल्ला केला, दगडफेक केली. तिथे जवळच पोलिसचौकी होती. दलवाईंना जखमी अवस्थेत तिथे नेलं गेलं. त्या वेळी मी मुंबईला होते. सकाळी उठल्याबरोबर पुण्याहून फोन आला, "तुम्ही पेपर वाचला असेलच तर घाबरू नका. हमीदभाई चांगले आहेत. काळजी करायची गरज नाही.” मला काही कळेना. अहो, इतक्या सकाळी पेपर वाचायला कुणाला वेळ असतो? घरातली कामं आवरायची की पेपर वाचत बसायचं, सावकाश पेपर वाचण्याची सवय. त्यामुळे ते काय बोलतात? काही वेळ कळलंच नाही. मग त्यांनाच मी विचारलं. काय आहे पेपरात? त्यांनी डोक्याला हात लावला असेल! पण मी तरी काय करणार? 'हमीदभाईंनी तुम्हांला फोन करायला सांगितला आहे.' मी म्हणाले, त्यांना जर काही झालं नाही तर हे स्वतः फोनवर का आले नाहीत. 'मेहेरबानी करून तुम्ही मुंबई सोडून पुण्याला येण्याचा प्रयत्न करू नका. यासाठी फोन केला आहे.' फोन ठेवला. काय झालं ते पेपर वाचून कळलं. हे सगळं थंड झाल्यावर मुंबईला आले. पण या विषयावर फारशी चर्चा झाली नाही.

 नोकरी सोडल्यानंतर फुल टाईम काम हेच सुरू झालं. तलाकपीडित मुस्लिम स्त्रियांची परिषद पुण्यामध्ये झाली. ७३ मध्ये. त्यात मी होते. त्यांच्या जवळजवळ सगळ्या प्रोग्रॅम्समध्ये मी होते. पहिली मीटिंग बांद्रयाला झाली. विषयाची माहिती नाही. कसं बोलतात माहिती नाही. महंमद दलवाई म्हणजे ह्यांच्या आतेभावाचा मुलगा, माझ्या आत्तेबहिणीचा नवरा. (त्या वेळी नव्हता असा संबंध.) हे दोघे लहानपणापासून बरोबर वाढलेले. शिक्षण दोघांचं बरोबरीनं झालं. सगळे हाल दोघांनी बरोबर काढले. मित्र पण होते. नातेवाईक होते, हितचिंतक होते. महंमददांनी ह्यांना खूप मदत केली. पहिल्या मीटिंगमध्ये ते मला घेऊन गेले. बांद्रयाला. स्टेजवर दलवाई उभे राहिले. आम्ही खाली सतरंजीवर. नुसती मुस्लिमांची मीटिंग ठेवता येत नाही. आताही नाही. कारण त्यामध्येही हितचिंतक हिंदू असतात, त्या काळात हिंदू जास्त, मुस्लिम कमी. पण मुसलमान असायचे. काही बोलायचे. टीका करायचे. तर तशी मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये हे बोलले, बोलताना ह्यांना घाम फुटला. हे घाबरतात, हे पण माझ्या लक्षात आलं.

मी भरून पावले आहे : ८३