आल्या तशा आम्ही टेप करून घेतल्या. काही वेळा वाटायचं की बस झालं आता आणि मी मुंबईला निघून जायची. थोडी शांत व्हायची. आणि बोलावंसं वाटलं की पुन्हा पुण्याला यायची. अशा किती तरी फेऱ्या झाल्या.
टेप झाल्यावर त्या लिहून काढायचं काम थोडथोडं सौ. मराठे व त्यांची मुलगी ज्ञानदा मराठे ह्यांनी केलं. मोठ्या प्रमाणात लेखन केलं ते श्रीमती वंदना कुलकर्णी यांनी. या लेखनाच्या टाइपरायटिंगला मदत 'वंचित विकास'चे संचालक श्री. विलास चाफेकर यांनी केली. सौ. ज्योती जोशी यांनी वाचनाच्या वेळी खूप मदत केली, सूचना केल्या. दहादहा वेळा वाचणं, परतपरत चुका सुधारणं हे खायचं काम नव्हे. हा सगळा त्रास बघून मी एकदा सरिताबाईंना विचारलं की तुम्ही का म्हणून त्रास घेता? त्या म्हणाल्या 'हमीद दलवाईंबद्दल खूप आस्था आहे. हे सामाजिक काम आहे. पुरोगामी विचार पुढे जावा अशी माझी मनोमन इच्छा आहे. म्हणून मला तुम्हाला मदत करावीशी वाटते.'
या सगळ्या गोष्टीला फार मेहनत लागली, वेळही लागला. पण चिकाटी धरली म्हणून हे पुस्तक पुरं झालं. पुस्तकाबद्दल सरिताबाईंनी प्रधान सर, पु.ल. देशपांडे, नानासाहेब गोरे यांना सांगितलं. त्यांना ही कल्पना खूप आवडली. प्रधान सरांनी तर पुस्तक प्रकाशित करायची जबाबदारी अंगावर घेतली.
हे पुस्तक आज पुरं झालं याचं सगळं श्रेय सरिताबाईंना आहे असं म्हणावंसं वाटतं.
मला एका गोष्टीचं समाधान आहे. हमीद दलवाई व्यासपीठावरून जे सांगत होते आणि ते गेल्यावर जे जे मी सांगत आहे ते ते मी माझ्या घरात आचरणात आणलेलं आहे. माझ्या दोन्ही मुलींना मी मराठीतून शिक्षण दिलं. मोठी रुबिना ग्रॅज्युएट आहे, दुसरी इलाही एम.ए.बी.एड. आहे. दोघी नोकऱ्या करतात, म्हणजेच स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. दोघींची लग्न रजिस्टर्ड झाली. हुंडा न देता,न घेता. दोघींनी धर्माबाहेर लग्न केलं असलं तरी आपला धर्म सोडलेला नाही. नाव बदललं नाही. आणि कुटुंबनियोजनाच्या बाबतीतही आमच्यासारख्याच त्याही चोख आहेत.
दलवाईंच्या माझ्याजवळ किती तरी आठवणी आहेत. एकोणीस वर्ष मी दलवाईंच्याबरोबर काढली. त्या काळात मी त्यांना समजू शकले नाही. मला तेवढा वेळच नव्हता. माझा संसार, माझी मुलं,आणि माझी नोकरी.