पान:मी भरून पावले आहे.pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दर्ग्यावर आमच्या घरी कधी कोणी गेलेलं नाही. दर्ग्यावर जायचं म्हटल्यावर प्रश्न पडला आणि यांना तर सांगायचं नाही. आता काय करायचं? जायचं म्हणजे टॅक्सीने जायचं. पैशाचाही प्रॉब्लेम होता. कसं यांना नेणार? कारण टॅक्सीशिवाय तर यांना नेता येत नाही. माझी आई दादरला रहायची. माझ्या आईला असं दर्गाबिर्गा ह्याचं खूप. आणि तिला माहिती पण खूप असायची. तिला सांगितलं की आमच्या बाबांना घेऊन जायचं आहे आणि बाबांची अट अशी होती की तू माझ्याबरोबर यायला पाहिजेस. म्हटलं, आता काय करायचं? यांना दुसऱ्या कुणाच्या स्वाधीन करून चालणार नाही. रस्त्यात काय झालं तर जबाबदार कोण? त्या वेळी मग आईला बोलावलं. ऑफिसातून मी हाफ डे रजा घेऊन आले. यांना काही सांगितलं नाही. माझी नणंद, बाबा, आई आणि मी एवढे टॅक्सीमध्ये बसलो आणि दर्ग्यामध्ये गेलो. तर दर्ग्याभोवती फेरी मारावी लागते. तिथे उभा राहाणारा जो मुजावर होता तो हात पसरून समोर उभा होता. तिथे पेटी ठेवलेली होती. बंद. लॉक केलेली. पण सगळे पैसे ठेवत होते त्याच्या हातावर. माझी जेव्हा पाळी आली तेव्हा मी म्हटलं, 'बाबा, तिथं लाकडाची पेटी टाळा मारून बाजूला ठेवलेली आहे. या माणसाच्या हातात का पैसे देता? ते पेटीमध्ये घातले पाहिजेत.' तर आमच्या आईला हे आवडलं नाही आणि तिने मला डोळे दाखविले. पण जेव्हा फिरताना माझी पाळी आली तेव्हा मी त्या मुजावरला विचारलं, “तू हात का बाबा पसरले? ती पेटी कशाला ठेवली आहे ? बाजूला हो आणि मला पेटीत पैसे टाकू दे." तिथं माझा आणि आईचा खूप वाद झाला. आणि ती म्हणाली की, “तुझं दर वेळेला असं असतं. म्हणून तुझ्याबरोबर यायला मला आवडत नाही. तुला वाद करायची गरज काय? इतक्या लोकांनी दिलेलं आहे. द्यायचं आणि मुकाट्याने बाहेर व्हायचं." म्हटलं, असं करूनच आपण लोकांना सवय लावतो. मग म्हणतो, पैसे खातात, अमूक करतात, तमुक करतात. हे काही बरोबर आहे असं मला वाटत नाही. अशा पीर-पैगंबरांच्या ठिकाणी तरी असं कधी होऊ नये असं मला वाटतं. हे बरोबर नाही. त्याच्यानंतर आम्ही बाहेर पडलो. बाबांना वाटेत चहा पाजला. बिस्किटं खाल्ली. आणि मग टॅक्सी करून घरी परत आलो. घरी परतलो. संध्याकाळ झाली आम्हांला. हे रात्री आले. आल्यानंतर बाबांनी कौतुकानं त्यांना सांगितलं की मेहरूने आज मला माहीमच्या दर्ग्यावर नेलं होतं. त्यांना ते आवडलं नाही. बाबांना काय बोलणार? मग मला म्हणाले, “काय मेहरू, बाबा बोलतात आणि तू वागते. हे काही बरोबर नाही. तुला हे पटलं का? तू कशाला घेऊन गेली?

७० : मी भरून पावले आहे