पान:मी भरून पावले आहे.pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नंतर हे म्हणाले, “मेहरू, आपल्या आटोक्यातलं नाही बुवा. हे बाबा काही कुणाचं ऐकत नाहीत. त्यांना बोलणार कोण?" नंतर चार दिवस गेल्यानंतर मी समजूत घातली. माझा खूप मान ठेवायचे आणि मी रागाने जरी बोलले तरी कौतुकाने घ्यायचे. त्या वेळी मी सगळं समजावून सांगितलं आणि म्हटलं, 'बाबा, हे बरोबर नाहीये. किती त्रास होतो. तुमच्यामुळे दुसऱ्याला पण त्रास होतो की नाही? असं नाही करायचं. तुम्ही उद्या जायचं हॉस्पिटलमध्ये.' आणि यांना म्हटलं, उद्या टॅक्सी घेऊन या, बाबांना घेऊन जा. टॅक्सीमध्ये बसवलं आणि म्हटलं, "बाबा, मी काही येत नाहीये. तुम्ही तिथं अॅडमिट न होता घरी आलात तर मी काही तुम्हांला घरात घेणार नाही. दार बंद करणार. घेणार नाही. तुम्ही जायचं गावाकडे, माझ्याकडे नको. आणि मी गावाला पण येणार नाही.” त्यांना थोडंसं काही तरी वाटलं. मग गेल्यानंतर अॅडमिट झाले. आणि मी यांना सांगितलं की, "तुम्ही तिथं थांबू नका. तुम्हाला बघितलं की फार लाडात येतात ते. तुम्ही थांबूच नका.” रात्री अॅडमिट केलं आणि काही तरी पहाटे ऑपरेशन होतं. ऑपरेशन झाल्यानंतर हे गेले. आधी गेलेच नाहीत. ते चांगले उठून बसले होते. “काहीच त्रास झाला नाही रे मला.” दहा पंधरा दिवस होते हॉस्पिटलमध्ये. दलवाई सतत त्यांच्याकडे असायचे. त्यांना जेवण भरवणं वगैरे सगळं. इतकं कुणी करणार नाही. मग घरी आल्यानंतर बेडवर होते. सासू काही माझी आली नव्हती. ते एकटेच आले होते. तर बेडवर संडास, लघवी व्हायची आणि ते सगळं मी काढलेलं आहे. मी धुतलेलं आहे. मग ते गावाला गेल्यानंतर सगळ्यांना सांगायचे की मरियमसुद्धा – माझ्या सासूचं नाव मरियम – करणार नाही एवढं मेहरूने केलं. मेहरूने माझी हिराकत उचलली. माझं सगळं केलं. तिला काही वाटलं नाही. मला लाज वाटायची पण ती म्हणायची, बाबा मी तुमचं सगळ करते. मुलीसारखं तिने सगळं केलेलं आहे. कुठे मी फेडणार आहे? एवढी सेवा ही मुलगी करू शकते? दलवाईंनी पण खूप केली त्यांची सेवा. त्यांनी बोलवल्यानंतर ते बेचैन व्हायचे. पत्र आलं ना की म्हणायचे, "बाबांचं पत्र आलंय. बाबांनी बोलावलंय.” “जा ना तुम्ही." खूष. बाबांना सांगायचे, बाबा, मी मेहरूला पत्र आल्याचं सांगितलं. मेहरूने सांगितलं बाबांना बघायला जा म्हणून. मेहरूने मला पैसे दिले. बाबांच्या तोंडातनं निघालं आणि ह्यांनी केलं नाही असं झालं नाही.

 माझ्याकडे राहिल्यानंतर बरे झाल्यावर बाबा म्हणाले, “मेहरू, एक गोष्ट सांगू का तुला? मला गावाला जायच्या अगोदर ना – हमीदखानला सांगू नको, हमीदखान करणार नाही आणि तो ओरडेल – त्या माहीमच्या दर्ग्यावर जायचंय."

मी भरून पावले आहे : ६९