मोठ्या मुलीला माझ्या तुम्ही लाख शिव्या द्या. खालची मान वर नाही करणार. एक सेकंद घेईल ती ममा म्हणून हाक मारायला. मनातसुद्धा ठेवणार नाही. आणि धाकटीला तुम्ही एक शब्द बोलला तर ती पहिल्यांदा तर आठ-आठ दिवस बोलायचीच नाही. आता बोलते. पण ती फुगून बसणार. मानीपणा. बघणारच नाही. 'माझी कुठे चूक आहे? तीच मला असं बोलली.' म्हणजे दोन्ही मुलींमध्ये सुद्धा फरक आहे.
एकदा बाबा, बाबा म्हणजे माझे सासरे, ते ऐंशी वर्षांचे असताना त्यांना आम्ही मुंबईला आणलं. त्यांना हर्निया झालेला होता. आणि तीस वर्षं त्या हर्नियाच्या त्रासानं ते आजारी होते. पण डॉक्टरची भीती. इंजेक्शन घ्यायचं नाही. दवाखान्यात जायचं नाही. औषध घ्यायचं नाही. त्यामुळे प्रश्न पडायचा ना, काय करायचं म्हणून. तर एकदा यांनी आणलं. “नाही बाबा चला, माझा संसार बघायला चला म्हणून." बाबांची यांनी खूप सेवा केली आहे. बाबांचे हे खूप लाडके होते. त्यांची मतं बाबांना पटलेली नाहीत. ते वाद घालायचे, बोलायचे, शिव्या पण द्यायचे. पण हे एक शब्द बोलायचे नाहीत. देऊ दे ना. काय आपल्याला भोकं पडतात का शिव्या खाल्ल्या म्हणून? तो मोठा माणूस आहे, आपण त्यांच्या चुका दाखवायच्या नाहीत.
तर आमच्याकडे त्यांना आणलं होतं. दोन महिने ते आमच्याकडे होते. सुरुवातीला आणलं तेव्हा गंमत झाली. संडासात गेले तर आमच्याकडे डालडाचा डबा ठेवला होता संडासात पाण्याला. कारण टिनपॉटलासुद्धा दोन-चार रुपये पडायचे. तेवढी आमची ऐपत नव्हती. आणि कशाला पाहिजे चार रुपयांचा टिनपॉट आणायला. डबा काम करतो. उपयोगी पडतो. बाबा संडासला गेले ते म्हणाले, हमीदखान, संडासचा पॉट कुठे? मी संडासला जाणार नाही. अडून बसले आणि यांनी बाजारात जाऊन दोन रुपयांचा संडासचा पॉट आणला तेव्हा संडासला गेले. 'अरे, इतकं कमावता, मुंबईमध्ये रहाता आणि थोड्याशा पैशांमध्ये घर चालविता? तुम्हांला एवढा पगार मिळतो तर एक पॉट तुम्ही आणू शकत नाही?' बाबांना कल्पना नसायची की मुंबईचा खर्च काय? किती लोकं आम्ही इथे घेऊन आलोय!
मग त्यांना दवाखान्यात नेलं, औषध आणलं. डॉक्टरांनी सांगितलं अॅडमिट करा, हर्नियाचं ऑपरेशन फार सिरीयस नसतं. करून टाकू. आता फार त्रास होतोय. तीनदा गेले. अॅडमिट व्हायलाच तयार झाले नाही. टॅक्सीने नेलं. के.ई.एम. मध्ये. तर तिथं जायला तयार नाहीत.