पान:मी भरून पावले आहे.pdf/82

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही.” त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की या माणसाचे इंटरेस्ट वेगळ्या ठिकाणी आहेत. आपण त्याला इथं ओढून काय उपयोग होणार? आपल्या कुठल्याच गोष्टीत ते दखल घेत नाहीत. आपला सहवास तर चाललेलाच आहे. पण थोडंसं त्यांचं मन आपल्याकडे वळण्यासाठी आपण त्यांच्या कामामध्ये इंटरेस्ट घेऊ या. मग मी वाचायची नाही पण त्यांना अधूनमधून विचारायची प्रश्न. “अहो, तुम्ही असं म्हणालात ना. मग त्याचा अर्थ काय आहे?" मग राजकारणावर बोलायचे. इंदिरा गांधींचं राजकारण काय आहे? अमूक काय म्हणाले? नेहरू काय म्हणाले? गांधी काय म्हणाले? मग असं हळूहळू विचारायला लागले आणि त्यांना इंटरेस्ट वाटायचा आणि मग ते माझ्या जवळ यायला लागले. त्यांना असं वाटायचं की ही इंटरेस्ट घेतेय ना, हिला कळतंय ना. मग आपण सगळंच हिला सांगावं.
 पण गंमत अशी आहे की, मला खूप गोष्टी नंतर कळायला लागल्या. आता मराठी शाळेमध्ये मुलांना घालणं. आता प्रचार तसाच होतो ना की महाराष्ट्रात रहाणाऱ्या माणसांनी मराठी शिकलं पाहिजे. ज्या प्रांतामध्ये आहे माणूस त्या प्रांताची भाषा त्याची आहे. तो कुठल्याही जातिधर्माचा असला तरी, हे आता मला कळलंय ना मी काम करते म्हणून. नाहीतर मला कसं कळणार? मी वेगळ्याच दृष्टीने बघत होते. आज मला वाटतंय की जे काही लोकांना ते सांगत होते ते सगळं आपल्या घरात त्यांनी केलेलं आहे. माझा विरोध झाला तरी त्यांनी केलेलं आहे. की नाही, हिला कधी तरी कळेल आणि नंतर मला अभिमान वाटायला लागला. रुबीना आमची मराठीमध्ये खूप चांगली लिहिते. तिला आता कसं, बिचारीला वेळ नाही किंवा घरच्या वातावरणात होत नाही. पण तिच्यात बापाची कला आहे. स्वभाव तसा आहे.

 हे दोघींना मांडीवर घेऊन बसायचे दोन्ही बाजूला आणि विचारायचे मोठीला, "बाब्या, तू कुणाची?" ती म्हणायची, "बाबा, मी तुमची. ममा, मी बाबांची." आणि दुसरीला विचारलं की ती माझ्याकडे बघायची आणि म्हणायची,"बाबा मी तुमची पण आणि मम्माची पण." तर म्हणायचे,"हा बघ दोघींतला फरक. ही बाब्या माझ्यासारखी आहे. भोळी, साधी, मनाची चांगली समजदार. आणि ही जी आहे ना, ही मेहरू, तुझ्यासारखी आहे. नाही नाही, म्हणजे तू काही वाईट आहेस अशा अर्थाने नाही, पण ही तुझ्यासारखी आहे आणि ही माझ्यासारखी आहे. तर कधी बाब्याला त्रास देऊ नको. कधी मार देऊ नको. कधी बोलू नको. लक्षात ठेव. तिच्यात माझं रूप आलेलं आहे." आणि हे खरोखर आहे.

मी भरून पावले आहे : ६७