पान:मी भरून पावले आहे.pdf/81

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमच्याकडे आलेली आहे. त्यामुळे आपण तिला त्रास देऊ नये. तिची नोकरी आहे." मला हे म्हणायचे, "बाबांच्याकडे पैसा असता तर नोकरीसुद्धा करू दिली नसती. तुला घरात बसून खायला घातली असती. आम्हांला वाईट वाटतं ग, तुला नोकरी करताना बघून.” त्या काळामध्ये फारशा बायका नोकरी करत नव्हत्या. त्या वेळी त्यांना वाटायचं की हे बरोबर नाहीये. हिने इतकी मेहनत घेऊ नये म्हणून. मला घरात त्रास होऊ नये म्हणून बहिणीला आणून ठेवलं होतं. तिने पण आई म्हणून खूप माझी सेवा केली आणि मी मुलगी म्हणून तिचं पालन केलं.
 हां, आणखीन एक म्हणजे त्यांच्यामध्ये अशी एक कला होती की एक गोष्ट, एखादा जोक सांगायचा असेल तर तो पन्नास वेळा सांगायचा. पण पन्नासाव्या वेळीसुद्धा तो जोक आपण कधी ऐकला नाही असं वाटायचं. आणि मी जर का एकदा एखादा जोक सांगितला आणि दुसऱ्या वेळी सांगायला गेले की म्हणायचे, "काय मेहरू, कालच सांगितलास." मी म्हणायची, "काय हो. तुम्ही पन्नास वेळा सांगता ते जोक!” “मी पन्नासाव्या वेळी सांगूनसुद्धा तू एन्जॉय करते ना. अग, तू पहिल्यांदा सांगितला तरी मी हा जोक एन्जॉय करू शकत नाही. सांगताना असं नाही सांगायचं. ही कला आहे. तू मला सांगून दाखव."

 आमचं घर लहान आणि घरामध्ये आमच्या जागा नाही. त्यामुळे आम्हांला कधी मनासारखं बोलायला मिळायचं नाही. कधी बसायला मिळायचं नाही, प्रेमाच्या गोष्टी तर जाऊच देत. कसलीच प्रायव्हसी नव्हती. मग मला कधी कधी चीड यायची. एकदा मी म्हटलं, काय हो आपलं घर आहे? साधी प्रायव्हसीसुद्धा नाही.” तर त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हटलं, “प्रायव्हसीचा अर्थ काय होतो, मेहरू? घरातली माणसं हाकलून देऊन प्रायव्हसी आपल्याला हवीय का? ही माणसं कुठे जाणारेत?" आणि त्यानंतर मी माझी मुलं होस्टेलमध्ये घातली. नणंद गेली लग्न होऊन. आम्ही दोघंच. घर खाली. तासभर आम्ही सोफ्यावर. एका टोकावर हे आणि एका टोकावर मी बसलो. आणि तासाभरात आम्ही एक शब्दही बोललो नाही. तेव्हा हे म्हणाले, “काय ग. तुला प्रायव्हसी पाहिजे होती ना? मग आता तासभर मी तुझ्याजवळ बसलोय. तू एक शब्दही बोलली नाहीस. तू बोलणार काय? तुझ्याकडे विषय काय आहे? माझ्याकडे सतरा विषय आहेत. तुला बोलून दाखवतो. आपल्याकडे दुसऱ्याशी बोलायलासुद्धा विषय लागतात.” म्हटलं, “आहे की माझ्याकडे विषय.” "तुझ्या ऑफिसचे विषय नकोत. तुझ्या मैत्रिणीचे विषय नकोत. घरातले विषय नको. मग जे विषय मला पाहिजेत ते तुझ्याकडे आहेत का?

६६ : मी भरून पावले आहे