पान:मी भरून पावले आहे.pdf/80

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सैगल-बियगलचे पिक्चर त्यांना जास्त आवडायचे. जुन्या पिक्चरला जायचं असेल ना तर वीस-पंचवीस मित्र जमा करायचे. सगळ्यांना घेऊन जायचे. आणि ते ओळीनं लागायचे बघा. आठवडाभर सैगलचं पिक्चर, अमूक अमूक लागणार आहे. ते जाहिरात बघतच असायचे. सगळ्या गावाला जमा करून ते पिक्चर बघायचे. मुंबईला पण बघायचे. पुण्याला प्रभातला पण बघायचे. एक पिक्चर पन्नास-पन्नास वेळा बघायचे. सगळी गाणी पाठ होती. गाण्याचा षौक होता. सगळ्या रेकॉर्डस् जमा केल्या होत्या. कुठून कुठून जमा केल्या होत्या. आणि रात्ररात्रभर अशा मैफिली जमायच्या घरात. एकदा तर म्हणाले, तुझी झोपमोड होईल. तुला सकाळी ऑफिसला जायचंय. सगळ्या रेकॉर्डस् उचलतो आणि महंमद दलवाईकडे जातो. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर हा गृहस्थ रात्रभर आला नाही. मी जागीच, हे आता येतील म्हणून. सकाळी ६ ला आले. तर मला म्हणाले, “अग, चहा करत होतो. खात होतो. रेकॉर्डस् लावत होतो. सकाळ कधी झाली कळलंच नाही." आणि त्यांची मित्रमंडळी जमा झालं की खाणंपिणं व्हायचं. आणि मौज करायचे. रेकॉर्डस् सुद्धा खूप चांगलं चांगलं सिलेक्शन करून त्यांनी जमा करून ठेवल्या होत्या.
 मी लग्न झाल्यानंतर त्यांना नवीन कपडे शिवले होते. चार-पाच ड्रेस. त्या माणसाकडे एका जोडीपेक्षा कधी दुसरा जोड नव्हता. लग्न झाल्याबरोबर इतके कपडे! आम्ही गावी गेलो. पेटी भरलेली होती. गावामधल्या, जवळ जवळ सगळ्या माणसांना जमा केलं. जसे जसे आले तसे प्रदर्शनाला कपडे ठेवल्यासारखं केलं. मेहरूने चार जोड कपडे शिवले मला. हे असं शिवलं, तसं शिवलं. लोकांनी काय कौतुक केलं असेल! मेहरूचा एक पगार गेला याच्यात, मला तिने आधी कपडे शिवले, असं सारखं सांगायचे.

 काय होतं त्यांच्याकडे? लग्न झालं. नोकरी नाही. काही नाही. मी सगळे कपडे घेऊन आले होते त्यामुळे माझ्याकडे चांगले कपडे होते. त्यांच्याकडे नव्हते. त्यांना ते कौतुक वाटलं. कारण नोकरी लगेच मिळाली. आम्ही दोन महिने तिथे राहिलो आणि परत आल्याबरोबर त्यांना नोकरी मिळाली. तसं काय, मी त्यांना खायला घातलं असं म्हणू शकत नाही. पण त्या काळामध्ये मी घेतलं तर ते कौतुकाने लोकांना दाखवलं त्यांनी, की माझ्यासाठी तिने असं असं केलेलं आहे. मग सगळे म्हणाले की चांगल्या घरातनं ती मुलगी आलेली आहे. तिच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत. बाबा म्हणायचे, “नाही तर आमच्या हमीदखानमध्ये काय आहे म्हणून ती आलेली आहे? तिच्यावर संस्कार चांगले झालेले आहेत म्हणून ती

मी भरून पावले आहे : ६५