हुसेन जमादार आणि मी आमच्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकारिणीच्या मीटिंगसाठी एकदा पुण्याला आलो. ही ब्याण्णव सालची गोष्ट आहे, मीटिंग संपल्यावर जमादार म्हणाले, 'भाभी, मी सरिता पदकींच्याकडे माझ्या पुस्तकाच्या- जिहादच्या- संदर्भात जातो आहे. तुम्ही पण येणार का?' सरिताबाईंचं नाव ऐकून मी दचकले. त्यांचं नाव माझ्या परिचयाचं होतं. 'अहो जमादार, या बाई लेखिका आहेत ना? माझी त्यांच्याशी ओळख आहे. मी दलवाईंबरोबर दोनतीनदा गेलेली आहे. त्यांच्या घरी जेवलेली आहे. मात्र दलवाई गेल्यापासून मी त्यांना भेटलेसुद्धा नाही. फार मोठी चूक केली. दलवाईंच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना मी भेटलेली आहे. ह्यांनाच मी कशी विसरले? चला, चला, जाऊ या', असं मी म्हटलं आणि मी सरिताबाईंच्याकडे आले. त्यांना बघून मला खूप बरं वाटलं. त्यांच्याशी बोलताना दलवाईंची खूप आठवण आली. आणि मग बोलताबोलता माझ्या मनातल्या आठवणी लिहिण्याच्या संदर्भात मी विषय काढला. आपल्या सगळ्या अडचणी सांगितल्या. त्या ऐकून त्या चटकन म्हणाल्या 'त्यात काय कठीण आहे? मी तुम्हाला मदत करीन. केव्हा बसू या सांगा.' 'मी विचार करून सांगते.' असं मी म्हणाले. आम्ही घरी आलो. जमादार म्हणाले 'तुम्ही ह्यांची मदत जरूर घ्या, तुमचं काम होईल. आता जास्त विचार करू नका. कामाला सुरुवात करा. लिहिणं हे फार महत्त्वाचं आहे. याची काळाला गरज आहे.'
मी दलवाईंबद्दल लिहावं अशी बऱ्याच लोकांची इच्छा होती. काहींनी मला उत्साहही दिला होता. त्यात पुष्पाताई भावे, सरोजिनी वैद्य, आलू दस्तूर याही होत्या, निळूभाऊ फुलेही मला आठवणी लिहा म्हणत.
मी सरिताबाईंच्याकडे आले आणि आम्ही माझ्या आठवणी टेप करायचं ठरवलं. त्या म्हणाल्या 'दहा कॅसेटस्, दीड तासाची एक अशा, भरून लिहिण्याइतका मजकूर आहे ना तुमच्याकडे?' मी होकार दिला आणि अशा रीतीनं आमच्या कामाला सुरुवात झाली. टेप करायच्या आधी तासभर चर्चा, प्रश्नोत्तरं, घरी आल्यावर फेऱ्या मारून तासतास केलेला विचार. ते आयुष्यच जणू काही मी पुन्हा जगले. डोकं नुसतं भणाणून जायचं. अशा रीतीनं रोज दोनदोन तीनतीन तास बसून आम्ही त्या टेप तयार केल्या.
आठवणी टेप करायच्या ठरल्या खऱ्या पण आठवणी ओळीनं थोड्याच येतात? नंतरच्या आठवणी आधी आल्या, आधीच्या आठवणी नंतर आल्या.