पान:मी भरून पावले आहे.pdf/77

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आणि त्यांचा पुतण्या अली आणि हसनखान यांच्यामुळे ते गाडी खूप चांगली चालवायला शिकले. म्हणजे गाडी चांगली चालवणं म्हणजे काय ते हसनखाननी मला सांगितलं, “भाभी, आपण ज्याच्या गाडीमध्ये बसल्यानंतर कशी गाडी चालतेय ते कधी कळत नाही आणि आपल्याला भीती वाटत नाही तो माणूस खरा चांगला चालवणारा असतो." तर ह्याच्यावरनं कल्पना करायची. आणि सगळे म्हणायचे, आमची आत्यासुद्धा, 'हमीदनी मला नेलं होतं गाडीमध्ये तर माझा जीव आधी असा होत होता की ह्याला गाडी चालवता येत नाही, हा कसा नेईल? पण खूपच चांगली चालवतो ग गाडी', असं म्हणाली. तर गाडीनं मला ते ऑफिसमध्ये सोडायचे. काय करायचे? उशिरा उठायचे, दाढी वाढलेली. कधी उठल्याबरोबर दाढी करायचे नाहीत. आंघोळ करायचे नाहीत. नुस्त तोंड धुवायचं. संडासला जायचं. चहा-बिहा प्यायचा, पेपर वाचायचा आणि माझी वेळ झाली म्हणून चटकन खाली उतरायचे. गाडी-बिडी चकाचक करायचे. आपल्या अंगावर तेच खादीचे फाटके कपडे असायचे आणि मला ते सोडायला ऑफिसपर्यत यायचे. तिथे त्यांच्या ओळखीचे बरेच निघायचे, तर मी ओरडायची, 'काय हे? मी केवढी पॉश जाते. सगळे म्हणतात, 'वा, खान काय पॉश असते आणि तिचा नवरा बघा, फाटक्या कपड्यांमध्ये असतो, दाढी वाढलेली असते.' हे बाबा आपल्याला आवडत नाही, आपल्याला कमीपणा वाटतो. लोकांनी म्हटलं पाहिजे, 'वा, खानचा नवरा काय उठून दिसतो.' एकदा ऐकलं, दोनदा ऐकलं आणि तिसऱ्यांदा म्हणाले, "तुला कशाची जाणीव नाही. मी उठल्याबरोबर खाली जातो, गाडी साफ करतो. तुला त्रास होतो? तुला गाडीत कधी बसायला मिळणार? तुझा त्रास वाचावा, आपल्या हातून जेवढा तुझा त्रास कमी करता येईल तेवढा करावा, त्यासाठी तुला तिथे सोडायला येतो. तुझा नवरा म्हणून सोडायला येतो; का लोक काय म्हणतात म्हणून सोडायला येतो, याचा कधी तरी विचार कर." तेव्हा माझ्या लक्षात आलं, की नाही, आपलं हे कुठे तरी चुकतं आहे. गावाबिवाला कधी जायचं असेल तरी जाताना ते लोकांना जमा करायचे. हिशोब कसा असायचा, एस.टी.ने किती खर्च येतो? दहा रुपये. किती माणसं आपल्या गाडीत बसतात? पाच माणसं. मग एस.टी.ने आपण गेलो तर खर्च आपल्याला जास्त येईल ना. मग खाण्याचं सामान घरनं घेऊन जायचं. चपाती-भाजी. सगळ्यांना घेऊन जायचं. गावात गेलं की हमीदखानची टॅक्सी आली, हमीदखानची टॅक्सी आली म्हणत सगळं गाव जमा व्हायचं. मग तिथे म्हातारे-कोतारे आहेत ते सगळे गोळा व्हायचे. 'कायरे हमीदखान, गाडी आणलीस, टॅक्सी आणलीस?'

६२:मी भरून पावले आहे