पान:मी भरून पावले आहे.pdf/73

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दोन महिने मी अपसेट होते. मला अन्न गोड लागायचं नाही. घास उचलला की मुलींची आठवण. हे घरात शिरले की यांच्यावर चिडायची आणि यांच्याशी भांडण व्हायचं. इतकं म्हणजे घरात असह्य झालं सगळं, की नको असा संसार. मुलं सोडून कसला आपण संसार करणार आहोत? इतकं वाईट वाटायचं की नको बाबा, आपल्याला अशा रीतीनं मुलांना नाही ठेवता येणार. दोन महिने हे बघितल्यानंतर ह्यांना पण कंटाळा आला. ते म्हणाले की असं काही चालणार नाही. रोज समजूत घालायचे की अग, तुला विचारून टाकलंय. मी माझ्या मतानं टाकलेलं नाहीये. तू पण हो म्हणालीस. आपल्या मुलांच्या भल्यासाठी केलंय. आपल्याला गरज होती मेहरू, म्हणून केलंय. पण माझी समजूत पटायची नाही. एकदा माझ्यावर रागावले. म्हणाले, “हे बघ, मी घरात आलो आणि तुझा रडवा चेहरा दिसला ना, तर पुन्हा मी या घरात येणार नाही." असा जेव्हा दम दिला तेव्हा थोडं मी कंट्रोल केलं. नंतर मला असं वाटत राहिलं की मुलींना आपण चांगल्या करताच लांब ठेवलं आहे. तिथून माझ्या दोघी मुली एस.एस.सी.होऊनच बाहेर पडल्या.
 जेव्हा रूबीना आणि इला लोणावळ्याच्या बोर्डिंगमध्ये होत्या तेव्हा दलवाई त्यांना भेटण्याच्या निमित्ताने वारंवार पुण्याला दौरा काढायचे. मी खाऊ करून द्यायची. ते घेऊन जायचे. पाच मिनिटं मुलींना मांडीवर घेऊन बसायचे. त्यांच्या हातात खाऊ द्यायचे आणि मग इतरांशी बोलण्यात त्यांचा तास जायचा. ते तिथून मुलींना न सांगता कधी निघून जायचे ते कळायचंसुद्धा नाही. पुण्याला पोचल्यावर ताबडतोब ते मला मुंबईला फोन करायचे आणि मुलींची खुशाली कळवायचे. त्यांना सवय होती, दोन दिवस जरी मुंबईबाहेर गेले तरी ते फोन करून माझी चौकशी करायचे. मी जर त्यांना म्हटलं, 'कशासाठी त्रास घेता?' तर म्हणायचे मी बाहेर गेलो की मला तुझी फार काळजी वाटते. पण ते दिल्लीला गेलेले असताना मी पाठविलेलं चार-पाच पानी पत्र त्यांनी उघडूनसुद्धा वाचलं नव्हतं. कारण ते उर्दूत लिहिलेलं होतं ना!

  यांना रात्री घरी यायला नेहमी वेळ व्हायचा. कामाला हे जायचे दुपारी जेवूनखाऊन साडेबाराला आणि यायला बारा-एक वाजायचे रात्रीचे. त्यांच्या कामाच्या निमित्ताने जायचे. मराठामध्ये तर पाळ्याच असायच्या. पाळी असल्यावर प्रश्न यायचा नाही. पण जेव्हा सोशल वर्क सुरू केलं त्यांनी आणि कामाच्या निमित्ताने जायला लागले तेव्हा वेळ झाल्याबद्दल काही नाही म्हणायचं. कारण दुपारी आम्ही घरातच नसायचो. त्या वेळी डबे असायचे आमचे. मी डबा घेऊन जायची.

५८: मी भरून पावले आहे