आपल्यापासून मुलं लांब राहिलेली आपल्याला नाही आवडणार. अशा रीतीने मी विचार करायची. मग हे दोन-चारदा चंदावरकरांना भेटले. होस्टेलमध्ये गेले. त्या होस्टेलची सगळी माहिती काढली आणि नंतर त्यांनी ठरवलं की हे होस्टेल बरंय आपल्याला. काय हरकत आहे मुलींना ठेवायला? मला त्यांनी समजाविण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, “हे बघ, मेहरू तू दिवसभर ऑफिसात राहतेस. मुली शाळेमध्ये जातात. घरी मुली एकट्याच राहतात. मुलींवर संस्कार चांगले होणार नाहीत. आपण नसताना मुली उनाडक्या करणार आणि काहीही करणार. मग त्याला जबाबदार कोण रहाणार? असे आपण किती वेळा समज देणार मुलींना? तू घरी आल्यानंतर मुलं झोपणार आणि त्यांच्याकडे जेवढं लक्ष तू द्यायला पाहिजे तेवढं तू देऊ शकणार नाहीस. त्यामुळे मुलांचं तू नुकसान का करतेस? भावनाप्रधान होऊन चालणार नाही. जरा मुलांच्या दृष्टीने बघ. आपण ठेवून बघू या. ती माणसं खूप चांगली आहेत. माझ्या ओळखीची आहेत.” असं करून मग आम्ही चंदावरकरांकडे गेलो. त्यांच्याकडे गेल्यानंतर बोलणं-बिलणं झाल्यानंतर प्रश्न आला फीचा. तर किती फी असेल? तेव्हा ७५ रुपये एका मुलीची फी होती. आता आम्हांला पगार दोन-चारशे रुपये. ७५ रुपये एकीचे दिले तर खाणार काय? प्रश्न पडला. ते म्हणाले, तुम्ही एकीचीही फी देऊ नका. मी दोन्ही मुलींना सांभाळतो. तुम्ही काही काळजी करू नका. हमीदभाईंसाठी मी एवढं करायला तयार आहे. मी म्हणाले, 'नाही बुवा, मला नाही पटणार हे. त्यांना पटलं असेल तरी मला नाही पटणार.' मग असं ठरलं की एकीच्या फी मध्ये दोन्ही मुली आम्ही ठेवायच्या. तर दोन्ही मुलींना घेऊन आम्ही सोडायला गेलो. सोडून हे निघून आले. मी दिवसभर थांबले तिथे. आणि मला आठवतंय, रुबीना १२ वर्षांची आणि इला ५ वर्षांची. इलाबद्दल बाईंनी सांगितलं की हुशार आहे मुलगी ही. आम्ही पहिलीला घालू. माँटेसरीत घालायला नको. का तर ती इंग्लिश माँटेसरीमध्ये गेली होती. लहानच होती. तर नंतर मला त्या सोडायला निघाल्या. मला अजून आठवतंय ते. त्या दोघी हातात हात घालून मला सोडायला आल्या. मी पुढे, त्या मागे. गेटपर्यंत आल्या. रुबीना आमची समजूतदार होती. त्यामुळे ती रडली नाही. तोंडावरून गलबलल्यासारखी वाटत होती. पण इला आमची एवढीशी लहान असतानाही कंट्रोल करत होती की आपले अश्रू बाहेर पडायला नकोत आणि माझ्या मम्माला हे अश्रू दिसायला नकोत. आणि मीही स्वतःला कंट्रोल करून बाहेर पडले पण घरी येईपर्यंत माझ्या डोळ्यांचं पाणी थांबलं नाही. अजून ती आठवण आली तरी मला भरून येतं.
मी भरून पावले आहे : ५७