तुमच्या मुलीला चटकन जागा मिळेल.” असं करून त्यांना, रुबीनाला मी जबरदस्तीनं तिकडे पाठवलं. चार तास तो माणूस लाईनीत उभा राहिला. दलवाई म्हणून त्याला कोणी ओळखलं नाही. आणि त्यांच्या मुलीला तिथे प्रवेश मिळाला नाही. आणि ते एवढंसं तोंड करून मला म्हणाले, 'तुझ्यामुळे मी तिथं गेलो.' तर मी म्हटलं, 'भाषणं करायला अशा ठिकाणी का जाता तुम्ही? जिथे तुमच्या मुलीलासुद्धा प्रवेश मिळू शकत नाही. तर काय कारण आहे जायचं?' तर ते म्हणाले, 'ती वेगळी गोष्ट आहे, ही वेगळी गोष्ट आहे. त्याच्यावर वाद करायचा नाही.' मग आम्ही महिलासंघाच्या शाळेमध्ये तिला घातलं. त्या शाळेचा फारसा चांगला अनुभव आला नाही. तिथं काय व्हायचं? ही जरा लाजायची तिला काही कळलं नाही तर. मी म्हणायची, काही कळलं नाही, तर उठून विचारावं. तर ती म्हणायची, ममा, अग, बाईंना उठून विचारायचं काय? उभं राहूच देत नाहीत. खाली बसवतात. काही विचारायचं नाही. त्यामुळे तिचा अभ्यास मागे पडला. मग म्हटलं, ट्यूशन ठेवली पाहिजे. आमच्या कॉलनीमध्येच एक बाई होती. तिला आम्ही सांगितलं की गणित-बिणीत हिचं घे आणि नेमकी गणितात ती नापास झाली. खरं म्हटलं तर ती हुशार मुलगी. कुठल्या विषयामध्ये नापास व्हायची नाही. मराठी तर तिचं इतकं चांगलं की सगळे म्हणायचे की मोठी झाल्यानंतर दलवाईंसारखं लिहिणार ही. इतकं मराठी सुंदर तिचं आणि तिथं ती फेल झाली सातवीमध्ये. तोपर्यंत धाकटी माझी पाच वर्षांची झाली. सहा सात वर्षांचं अंतर मुलींमध्ये. त्याच वेळी माझी नणंद फातिमा हिचं आम्ही महंमद खडसशी लग्न करून दिलं. आता प्रश्न पडला मुलींना सांभाळणार कोण? बाई ठेवली. बाई दोन दिवस यायची; चार दिवस यायची नाही. काय व्हायचं? मला ऑफिसातून सुट्टी घेऊन घरात राहायला लागायचं. तेव्हा भांडणं सुरू झाली मुलांच्यावरनं. मला त्रास व्हायला लागला. पण राग कोणावर काढणार? ह्यांच्यावर काढणार. त्यामुळे घरातलं वातावरणच बिघडून गेलं. काय करायचं ही चिंता लागली. त्या काळामध्ये जी. एल. चंदावरकरांनी मदत केली. त्यांनी मला बरेच वेळा कॉन्टॅक्ट केलं होतं. ह्यांच्या ओळखीचे होते. लोणावळ्याला 'गुरुकुल' हे त्यांचं फार चांगलं होस्टेल होतं. मुलामुलींचं. तर ते मागे लागले होते की तुमची मुलं माझी समजून मी ठेवीन. तुम्ही काही काळजी करू नका. हमीदभाई असे बाहेर जातात. तुम्हांला त्रास होतो. तर तुम्ही मुलींना ठेवा. तर मी म्हटलं की नको बाबा. बिनवारशी मुलांसारखं कशाला आपण मुलांना होस्टेलमध्ये घालायचं?
पान:मी भरून पावले आहे.pdf/71
Appearance