पान:मी भरून पावले आहे.pdf/70

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तेव्हा वाद झाला कुठल्या भाषेच्या शाळेमध्ये घालायचं? माध्यम कुठलं घ्यायचं? मी उर्दूमध्ये शिकलेली होते. ते मराठीमध्ये शिकलेले होते. त्यांना मराठीचा फार अभिमान होता आणि मला उर्दूचा अभिमान होता. त्या वेळी मला पण असं वाटायचं ना, की मुलीला उर्दू शाळेत घालावं. हे म्हणाले की आपण मराठी शाळेमध्ये घालू या का? मराठी शाळेमध्ये का म्हणून? तर आपल्या मुलांना मराठी आलं पाहिजे. चांगली भाषा आहे, महाराष्ट्रामध्ये राहतो, हे म्हणायला लागले. तर म्हटलं, अहो, हे सगळं हिंदूंचं चांगलंच म्हणून घ्यायचं की काय? आपण मुसलमान. शेवटी आपली भाषा उर्दु आहे. आता जशी लोकं करतात तशी आरर्ग्युमेंट मी त्या वेळी करत असे. 'नाही, नाही. आपल्याला नाही बुवा आवडणार आपल्या मुलीनं हिंदूंचा अभ्यास शिकलेला.' असा वाद झाला आमच्याकडे. पण ते म्हणाले, 'नाही, माझी मुलगी मराठीमध्येच मला शिकवायची.' आणि जाऊ दे, यांचं भांडण नको म्हणून मी सोडून दिलं.

 हे आमच्या घरात पण मराठीच बोलायचे. मी माझ्या आईच्या घरात उर्दू बोलायची. आमच्या घरी मराठी बोलल्यामुळे ते आमच्या माहेरच्या लोकांना आवडायचं नाही. ते म्हणायचे, की काय आहे तुझा नवरा? मराठी भाषा काय आपली आहे? आपल्या घरात का बोलली पाहिजे? असा वाद व्हायचा. मग आमच्या इथे कर्व्यांची शाळा होती. तिच्यात रुबीनाला घातलं. ४ थी पर्यंत खूप चांगलं शिक्षण झालं. पण आता मराठी शाळेमध्ये घातलं तर घरी अभ्यास कोण घेणार? ह्यांना वेळ नाही. मराठी येतं पण वेळ नाही. मला वेळ असला तरी मराठी येत नाही. कसं करणार? माझी धाकटी नणंद होती. १६-१७ वर्षांची. मी घेऊन आले होते तिला बरोबर. ती काही फार शिकलेली नव्हती. ५ वी - ६ वी जेमतेम शिकलेली. गावचं शिक्षण ते. तिच्या भरोशावर आम्हांला रुबीनाला शिकवणं मान्य पण नव्हतं. आणि परवडण्यासारखं पण नव्हतं. पण शाळा चांगली असल्यामुळे आणि दलवाईंची मुलगी म्हणून सगळे मानत पण होते म्हणून तिचा खूप चांगला अभ्यास शाळेने करून घेतला. तिसरी-चौथी अशी ती यायची. आता ४ थी नंतर शाळा बदलायचा प्रश्न आला. शाळा बदलायची म्हणजे कुठं बदलायची? आम्ही अंधेरीला राहतो. पार्ल्याच्या टिळक विद्यालयामध्ये घालावं म्हटलं, तर खूप गाजलेली शाळा आहे. खूप चांगलं नाव आहे. म्हणून मी म्हटलं, “अहो, आपण त्या शाळेमध्ये आपल्या मुलीला घालू या." हे म्हणाले, "नको." म्हटलं, “का? तुमची दोनतीन भाषणं पण झालेली आहेत तिकडे. तुम्हांला लोक ओळखतात.

मी भरून पावले आहे : ५५