पान:मी भरून पावले आहे.pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
राहून राहून मनात येतं

 मी साहित्यिक नाही, लेखिका नाही, मी टीचर नाही किंवा प्रोफेसरही नाही.मराठीचं मला ज्ञान नाही. का तर मी मराठी माध्यमातून शिकलेली नाही.मला लिहिण्याचा व वाचण्याचा छंदही नाही. माझं शिक्षण उर्दूत झालं आहे. तरीसुद्धा मला कैक वर्षांपासून माझ्या अशुद्ध मराठीतच माझ्या शैलीत लिहावंसं वाटत होतं.दलवाईंच्या खूप आठवणी माझ्या मनात साठलेल्या आहेत. त्यांची कुठंतरी नोंद व्हावी असं मला वाटत होतं.
 माझे माहेर जगावेगळं, माझं सासर जगावेगळं, माझा संसारही जगावेगळाच. या साऱ्यांबद्दल मला लिहावंसं वाटत होतं. मला असं वाटायचं की माणूस कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही मूडमध्ये, कुठेही आणि कधीही लिहू शकतो. म्हणून तर मी दलवाईंना त्यांच्या अखेरच्या गंभीर आजारपणातसुद्धा लिहायचा आग्रह करीत होते. पण जेव्हा माझ्यावर वेळ आली तेव्हा लक्षात आलं की लिहायचं काम इतकं सोपं नाही!
 पहिल्यांदा वाटलं की आपण कुणाला तरी डिक्टेट करावं.पण माझी सांगण्याची गती आणि लिहिण्याची गती कशी जमली असती? आपण टेप करू या असंही मनात आलं. पण तेही मला जमलं नाही. या विचारात कैक वर्ष उलटून गेली. नवरा लेखक असतानासुद्धा लेखन म्हणजे काय हे मला कळलं नाही हे खरं.
 आमचा संसार एकोणीस वर्ष झाला. आता त्यांना जाऊनही अठरा वर्ष झाली. मी त्यांचं काम करायला लागले तेव्हा खरा हमीद कसा होता, त्याचे विचार काय होते, हे मला कळलं. म्हणून मला त्याबद्दल खूप खूप लिहावंसं वाटू लागलं.