असं काही नाहीये की बायकांनी जाऊ नये आणि पुरुषांनी जावं. सगळं काम तुझं तुला करावं लागेल.” एकदा काय झालं, माझा अन् त्यांचा काही तरी वाद झाला, भांडण झालं आणि मला खूप राग आला त्यांचा. मी कधी तशी घरातून बाहेर जात नसे. पण त्या दिवशी रागाच्या भरात मी तयारी-बियारी केली. ते म्हणाले, "काय? कसली तयारी करतेस?" मग त्यांनी पुन्हा विचारलं, “मधेच जातेस? काय झालं तुला?" म्हणजे लक्षात नाही राहिलं की आपण असं भांडलोय. मी म्हटलं, “मला जायचंय म्हणून.” “किती दिवसांनी येणार?” “बघीन.” अन् पेटी घेतली आणि मी पुण्याला पोचले. पुण्याला गेल्यानंतर माझी आत्या म्हणाली, "तू एकटीच आलीस. हमीद आला नाही तुझ्याबरोबर? काय तरी झालेलं दिसतंय दोघांचं.' आणि तिने मला तासडलं रागात. "नाही" म्हणाली, "हे चुकीचं आहे. तू त्याला बरोबर न घेता रागवून आलीस कशी? तू अशी रागानं का निघून आलीस? बायकांनी असं करायचं नाही.”
म्हणजे ही गोष्ट घडली तेव्हा लग्नाला फार दिवस झाले नव्हते. मोठी रुबीना होती. धाकटी नव्हती. नंतर काय झालं, संध्याकाळ झाली. ते लोक पिक्चरला जायला निघाले. आत्या म्हणाली, 'चल तू पण आमच्या बरोबर. घरात बसून काय करणारेस?' आणि तिकीट-बिकीट काढलं. आम्ही सगळे तयार झालो आणि निघायचं तर हे समोर. म्हणाले, हे काय? आत्यांनी त्यांना विचारलं, 'हे काय? तू इकडे?' तर मला डोळा मारला. म्हणाले, "तू काही जायचं नाही पिक्चरला." आणि म्हणाले, “हिला सांगा जरा. जरा काही वाद झाला तर रागाने निघून आलेली आहे. तिला कळत नाहीये मला किती मनःस्ताप झालेलाय. तिथून मी इथे कशा रीतीने आलोय हे हिला कळलेलं नाहीये. तुम्ही हिला समजून सांगा. हिने अशा रीतीने घर सोडून यायचं नाही. हे बरोबर नाहीये. वाद काय होत नाहीत का माणसांत?" असं म्हणून ते लोक गेल्यानंतर हे म्हणाले, “मेहेरबानी करत जा. चिडून रागावून कधी तू माझ्यापासून लांब जात जाऊ नको. मला नंतर तू चिडव. अग, मी चेष्टा केली. वाद होत नाही का? कोणाचं कधी भांडण होत नाही का?" अशा रीतीनं ते एक भांडण मिटलं.
मग दुसऱ्यांदा प्रश्न आमच्या रुबीनाच्या शाळेचा आला. तिचं वय साडेतीनचार झाल्यानंतर तिला शाळेमध्ये घालायचं होतं. आधी आम्ही माँटेसरीमध्ये घातली होती आमच्या कॉलनीमध्ये. तिथे इंग्लिश पण असायचं, मराठी पण असायचं, तेव्हा काही वाद झाला नाही. पण आता पहिलीमध्ये घालायचं.