Jump to content

पान:मी भरून पावले आहे.pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 दलवाई कधी कधी प्रवासाला जायचे. प्रवासाला म्हणजे त्यांचे दौरे असले की ते जायचे, जाताना मी त्यांचं सगळं सामान म्हणजे लाँड्रीचे कपडे, दाढीचं सामान म्हणा,इतर सामान म्हणा, सगळं जमा करायची आणि पलंगावर नेऊन ठेवायची. पेटी भरायला गेले की ते म्हणायचे, "नाही नाही, तू पेटी भरायला यायचं नाही. तुझी एक गोष्ट मला सापडणार नाही. मला भरू दे." जाताना त्यांच्या दोन्ही बॅगा, न्यूज पेपर घेऊन मी त्यांच्या मागे जाई. स्टेशनवर जायचं, तिकीट काढून द्यायचं, त्यांना रेल्वेमध्ये बसवायचं, सांगायचं, तुमच्या बरोबर एवढे एवढे डाग आहेत आणि परतायचं. इतकं मी करी. हे त्यांच्यासाठी मी करायची. त्या वेळी, ते मला सांगत होते म्हणून मी करत नव्हते. पण मला असं वाटायचं की आपण अशा रीतीने त्यांचा भार थोडा तरी हलका करावा. त्याच्या उलट मला पुण्याला जायचं असेल, मी गावाला कुठे जाणार? पुण्याला. तर सकाळी सातची गाडी मी धरायची. म्हणजे ६ ला मला निघायला लागायचं. म्हणजे काळोख असायचा. माझी मी तयारी करायची. हे झोपलेले. मी बाहेर पडले तरी पांघरूण काही अंगावरचं काढायचे नाहीत. मग, 'अहो, मी निघाले हो. मला आता वेळ होतोय, निघायला हवं' असं मी म्हणायची. त्यावर हे म्हणायचे, "हो, मेहरू, तू जा हं. सांभाळून जा. काही काळजी करू नको आणि लौकर ये हं. जा." आणि परत पांघरूण डोक्यावरून घ्यायचे आणि झोपायचे. असं वाटत नव्हतं की काळोख आहे, त्यातून ती एकटी जातेय, असं त्यांना जाणवायचं नाही. म्हणजे लक्षच नसायचं आणि दुसरं असंही वाटायचं नाही की ही बाई आहे. ही एकटी कशी जाईल? तर हे अजिबात नव्हतं. का, तर लग्न झाल्यानंतर कधी कधी रात्रीचे सुद्धा मला १० ला आणि ११ ला म्हणायचे, माझं डोकं दुखतंय, जरा अॅस्पिरीनची गोळी हॉटेलातून घेऊन ये. एकदा मी म्हणाले, अहो असं काय करताय, किती वेळ झाला, किती वाजले बघा तरी! तर ते म्हणाले, “काय झालं? मी जाऊ शकतो तर तू का जाऊ शकत नाही?

मी भरून पावले आहे : ५३