पान:मी भरून पावले आहे.pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इव्हन त्यांचे मामासुद्धा आले, आणि त्यांना पैशांची गरज लागली की ते आतच पाठवीत. स्वतःकडे असले तर द्यायचे ५ रुपये, आणि आत पाठवायचे. आणि मग म्हणायचे, 'तो जो इसम आला होता ना, तो काय म्हणत होता?' 'तो असं असं म्हणत होता.' 'काय केलं?' दिले ना पैसे? हे बघ मेहरू, तू दिलेले कालचे ५ रुपये मी दिले ग त्याला. त्याची अडचण होती.' 'मग माझ्याकडे का पाठवलं?' 'हे बघ आपल्याकडे रुपया असेल आणि कुणी मागायला आलं ना तर चार आण्याची तरी मदत करावी. मी खूप हालात दिवस काढलेत, अशीच लोकांनी मला मदत केली.' म्हणजे ते आता समजा डॉक्टर अवसऱ्यांकडे गेले असतील. त्यांचं औषध डॉक्टर द्यायचेच, वर खिशात दहा रुपये टाकायचे. 'जाणार कसा तू? चालत जाऊ नको. गाडी घे, बस घे आणि जा.' अशा रीतीने डॉक्टरच त्यांना पैसे द्यायचे. मित्र होते त्यांचे. त्यामुळे मित्र मंडळी असं करायची. एवढंच नाही तर कॉलेजमध्ये असताना फर्स्ट इयरला, सेकंड टर्मची फी भरायला पैसे नव्हते, म्हणून ते कॉलेज सोडून बसले होते. कोण प्रो. जोशी का कोण होते, मला आता बरोबर नाव आठवत नाही, त्यांनी म्हणे त्यांना बोलावलं, विचारलं, त्यांची फी भरली आणि ती टर्म पुरी झाली. आणि नंतर काय झालं? नंतर काही वर्षांनी परिस्थिती जरा चांगली झाली आमची. तर ते फीची रक्कम घेऊन प्रोफेसरला द्यायला गेले आणि त्यांना सांगितलं, 'सर, तुम्हांला माझी आठवणसुद्धा नसेल, पण तुम्ही मला अशी अशी मदत केली होती. ते पैसे मी आणले आहेत.' प्रोफेसरांनी ते घेतले नाहीत. ते म्हणाले, 'इतका प्रामाणिकपणा जगात नसतो. तू हे पैसे दुसऱ्या कोणाला तरी दे.' त्यांना ही जाणीव होती की आपल्यावर वेळ आल्यावर लोकं आपल्याला मदत करतात, तसं आपल्याकडे कोणी आलं की आपण मदत केली पाहिजे. एवढंच नाही, गावाला आम्ही जायचो की नाही, एक दिवस राखून ठेवायचो. ते घेऊन जायचे मला. सगळ्या घरोघर जायचे. सगळे गोरगरीब, पण सगळे हमीदखान आला, आमचा हमीदखान आला असं म्हणायचे. बायका अशा वेड्या व्हायच्या. म्हाताऱ्या कोताऱ्या सगळ्यांना असं त्यांच्याबद्दल प्रेम. सगळ्यांच्या डोक्यावरून हात फिरव, पाठीवरून हात फिरव, टिंगल कर, मस्करी कर, आणि काय काय बोलतील, त्यांना खूप आवडायचं ते. आणि मदत पण करायचे. असे घरोघर फिरायचे. सगळ्यांची परिस्थिती जाणून घ्यायची आणि जी मदत होईल ना ती करायची. ती सवय आजपर्यंत मला आहे. कुणाला चार आणे, कुणाला आठ आणे, कुणाला रुपया, आपल्याकडे पाच रुपये असतील तर पाच रुपये वाटायचे.

मी भरून पावले आहे : ४९