पान:मी भरून पावले आहे.pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आपल्याला मोठी घरं नको आणि मग आम्ही हे बघितलं की ही सध्याची खोली रिकामी होती, म्हणजे कोणी तरी तिथं राहात होतं पण काही तरी भानगड झाली म्हणून ती रिकामी झाली. आम्ही तिथं राहायला लागलो. १९६५ सालची गोष्ट आहे. १९६५ मध्ये आम्ही आलो तेव्हा आम्हांला साडेतीनशे रुपये अॅडव्हान्स आणि ७० रुपये भाडं होतं. खोली मिळाली पण साडेतीनशे रुपये होते कुठं?
 दोघंही नोकरी करत होतो पण घरात एवढी माणसं होती. शिवाय गावी पैसे पाठवायचे. यांना दोनशे रुपये पगार, मला दीडशे रुपये पगार. एवढ्यामध्ये पंचवीस-पन्नास रुपये गावी जायचे. घरी खाणारी मुलं होती, तेव्हा जेमतेम चालायचं. साडेतीनशे रुपये कुणाच्याकडून तरी मागून आणले आणि भरले. आणि सत्तर रुपये मेटेनन्स चार्जेस. तरी सत्तर रुपये कधी आम्ही महिन्याला दिले नाहीत. बरीच वर्षं तिथं गेल्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की हे भाड्याचं घर नाहीये, ओनरशिप आहे आणि तुम्हांला सगळे पैसे भरावे लागणार. तेव्हा मी माझ्या ऑफिसमधले प्रॉव्हिडंट फंडातले पैसे काढून भरल्याचे मला आठवतात. तो एक एक महिना आमचा कसा जात होता हे आम्हांलाच माहीत! आम्ही नॉनव्हेज खाणारे, पण त्या काळामध्ये सुद्धा मटण आम्हांला पाव किलो सुद्धा परवडत नसे. पाव किलो मटण आणायचं, बारीक बारीक तुकडे करायचे, त्याचं कालवण करायचं, अशा रीतीने दिवस काढले. पण नोकरी होती म्हणून आमचं चाललं. तो काळ आमचा चांगला गेला. वाईट गेला अशातला भाग नाही. कारण आम्हा दोघांची खुशी होती. त्या वेळी आमच्याकडे झिगझिग कधी झाली नाही. भांडणं अशी कधी झाली नाहीत. निराशा झाली नाही. कारण माझ्याकडे सगळ्यांचं लक्ष. घरात खूप असायचं. हे बघायचे, की मी जास्त त्रास घेऊ नये. जो काही स्वैपाक झालेला असे तो पोटभर खाऊन जाते का नाही, हे ते पाहात. तू डबा घेतला का नाही? तू चहा प्यायली का नाही, तू भाकरी खाल्ली का नाही? आम्हांला नसलं तरी चालेल, तू पोटभर खा, डबा व्यवस्थित घे, ही काळजी माझी ते करीत.

 माझ्या मुलींना नणंद सांभाळायची, लहान होती ना. त्यामुळे मुलींना सांभाळायची. तिला घरकामासाठी आणलेली होती. म्हणजे दलवाईंना तीन बहिणी होत्या. ही सगळ्यांत धाकटी होती. दोघी मोठ्या यायला तयार होत्या. हे म्हणाले, नाही. त्यांचा जीव त्या धाकटीवर खूप होता आणि ती खूप चांगली होती कामात. ती माझ्याकडे होती. अशिक्षित होती. पाचवी-सहावी शिकलेली होती. म्हणजे तिला काही शिक्षणाची आवड नव्हती.

मी भरून पावले आहे : ४५