पान:मी भरून पावले आहे.pdf/59

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हिचा काय संबंध त्याच्याशी आणि करेना ती बाजूला धंदा. तिने तेवढा सीरियसनेस दाखवला नाही. गॅलरीमध्ये मी झोपले असताना रात्रीच्या वेळी अॅक्सिडेंट झाला. एक लॉरी आली आणि आमच्या गॅलरीजवळ एक खांब होता त्याला आपटली. मी पटकन उठले आणि माझं अॅबॉर्शन झालं. दोन बादल्या रक्त गेलं. पहाटेची वेळ होती. घरात माझा दीर आणि नणंद होती. ती लहान होती आणि हे 'मराठा'मध्ये काम करत होते, ह्यांची रात्रपाळी होती. आणि त्याच दिवशी कसले तरी शंभर रुपये त्यांना मिळाले होते, ते घेऊन घरी येत होते. आणि यांना कळलं की के.इ.एम. हॉस्पिटलमध्ये दाखल केलं मला. ते तिथं आले. दोन दिवस के.इ.एम. मध्ये होते. मग मी येऊन घरी राहिले. माझी रजा वाया गेली. मी वाचले मरता-मरता. त्याच्यानंतर मी म्हटलं, मला या घरात रहायचं नाही. तुम्ही काहीही करा. मग ते घर आम्ही सोडलं आणि आईच्या घरी आलो. आईच्या घरात मी राहिले, अॅबॉर्शन झालं म्हणून मी राहिले. माझी नणंद आणि माझी मुलगी माझ्याबरोबर होती. हे आणि यांचा भाऊ मग पुन्हा महंमद दलवाईंकडे! त्यांना रेल्वेतील नोकरी नकोच होती. दिवस ढकलून काढायचे. स्टोअरमध्ये ठेवलं होतं त्यांना. स्टोअरमध्ये काय त्यांना इंटरेस्ट आहे? दोन वर्षांनी त्यांनी नोकरी सोडली. त्याच्यानंतर 'मराठा'मध्ये लागले. अत्र्यांनी मात्र त्यांचं खूप कौतुक केलं.

 काश्मीरला गेले होते हे 'मराठा'त असतानाच. कुणालाही न सांगता गेले होते. कुणाला सांगायला वेळ नाही आणि आपले आपण प्रतिनिधी बनून गेले. तिथून लेख पाठवायला सुरुवात केली. तेव्हा आम्हांला घरात कळलं की हे काश्मीरला गेले म्हणून. तोवर आम्हाला माहिती नव्हतं. मग हे तिथं असताना चारपाच लेख त्यांचे प्रसिद्ध झाले. अत्र्यांनी खुप पाठ थोपटली त्यांची. आणि गंमत अशी की 'मराठा'त नोकरी केली पण खूप रजा व्हायला लागली त्यांची. आम्ही आईकडे थोडे दिवस राहिलो आणि मग त्याच्यानंतर म्हटलं की हे काही बरोबर नाही. आपल्याला घर सोडायला पाहिजे. आणि मग आम्ही अर्ज केला हाऊसिंग बोर्डाकडे. हे पत्रकार, म्हणून लोक ओळखत होते. म्हणून अंधेरीच्या हाऊसिंग बोर्डाकडे अर्ज केला. घरं चांगली मोठी होती. पण गंमत अशी होती की जंगलातून जायचं आणि त्या वेळी तिथं काहीच सोय नव्हती. खून व्हायचे रस्त्यामध्ये. मी म्हटलं, तुम्ही रात्री बेरात्री येणार. तुमची येण्याजाण्याची सोय नाही. एक तर सकाळपर्यंत तुम्हांला तिथं राहावं लागेल. रात्री कुणी मारून टाकलं तरी कळणार नाही.

४४ : मी भरून पावले आहे